शिवसेना कुणाची? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा सामना आहे. कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. तसंच धनुष्यबाण आम्हाला मिळणार नसेल तर ते चिन्ह गोठवा असंही कपिल सिब्बल म्हणाले आहेत. कपिल सिब्बल यांनी इतरही सगळ्या बाजू न्यायालयाला सांगितल्या. उद्या कपिल सिब्बल यांच्यासह ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरु होईल. दरम्यान आज करण्यात आलेल्या चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत काय म्हणाले?

धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा चिन्ह गोठवा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली. असा पर्याय त्यांनी दिला आहे. कपिल सिब्बल यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय करतं ते पाहु. होय आम्ही धनुष्य-बाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे कारण हे जेव्हा व्हायचं होतं तेव्हा झालं नाही. आता सगळं झाल्यानंतर पर्याय काय उरतो? जर आम्हाला म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्य-बाण चिन्ह देणार नसाल तर तो गोठवा ही मागणी करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह ढाल-तलवार होतं, मशालही होतं-सावंत

बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह ढाल-तलावरही होतं. नंतर धनुष्य-बाण होतं. मशाल होती. आता धनुष्य-बाण चिन्ह आम्हाला अशीच अपेक्षा आहे. पण तो आम्हाला मिळणार नसेल तर तो गोठवा ही मागणी आम्ही केली आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी सगळी उदाहरणं दिली आणि अपात्र कसं ठरवता येतं ते सांगितलं. सगळ्या प्रक्रिया उलटसुलट होत्या ते देखील सिब्बल यांनी सांगितलं. विधीमंडळातला पक्ष त्याचं आयुष्य पाच वर्षांचं असतं हा मुद्दाही कपिल सिब्बल यांनी सांगितला. राजकीय पक्ष कायम असते हे त्यांनी सांगितलं आहे असंही अरविंद सावंत म्हणाले.

आम्हाला धनुष्यबाण हवाच आहे पण…

आमदारांना अपात्र करता येतं. जर आमदार अपात्र झाले तर सगळ्या गोष्टी पुढे क्लिअर होतील. शिवसेनेच्या भावना या मशालीसह जोडल्या आहेत. शिवसेनेकडे धनुष्यबाण होता, ढाल-तलावर होती आता आम्ही मशाल घेऊन उभे आहोत. आम्ही अजूनही धनुष्यबाणावरचा दावा सोडलेला नाही. पण आम्हाला ते चिन्ह देणार नसतील तर ते चिन्ह गोठवा ही मागणी आम्ही केली आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.