पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मूच्या जनतेला काश्मीरशी मजबूत संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या युक्त्यांमुळे जम्मूची लोकं काश्मीरपासून दूर जात आहेत, असा आरोप मुफ्ती यांनी केला. ऑगस्ट २०१९च्या पूर्वीप्रमाणे जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने त्यांचा संघर्ष सुरूच राहील, असे माजी मुख्यमंत्री मुफ्ती म्हणाल्या.

“आज काश्‍मीर दुःखात आहे. झालेली जखम आणखीनच वाढत चालली आहे आणि काश्मीर आपल्यापासून दूर जात आहे,” असे मुफ्ती यांनी वकिलांशी संवाद साधताना म्हणाल्या. भाजपाचे नाव न घेता, त्या म्हणाल्या की “जे लोक कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व काही ठीक झाले आहे, असे म्हणत आहेत ते खोटे दावे करत आहेत. कारण जम्मू-काश्मीरमध्ये वास्तविक परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.”

“काश्मीरी लोक दिवसेंदिवस दुरावत चालले आहे, ते मला जाणवत आहे. काश्मीरमधील लोकांमध्ये दिवसेंदिवस संताप वाढत आहे आणि ते नैराश्यात आहेत. त्यामुळे जम्मूच्या लोकांनी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याप्रमाणे दुवा व्हावं. मुफ्ती मोहम्मद सईद यांना जम्मू-काश्मीरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता सेतू बनताना पाहण्याची इच्छा होती परंतु दुर्दैवाने हा प्रदेश दोन्ही देशांमधील संघर्षात बदलला आहे. मी जम्मूच्या लोकांना विनंती करते की तुम्ही काश्मीरसाठी उभे राहा आणि काश्मीरला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. तुम्हाला वाटत असेल की ते कुठे जाईल? जेव्हा हृदय तुटतं तेव्हा तुम्ही शरीराच्या इतर होत असलेल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही हरवला,” असे मुफ्ती म्हणाल्या.

“काश्मिरी एका रात्रीत बदलले नाहीत. हे तेच लोक होते ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानपेक्षा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष भारताला प्राधान्य दिले. आम्ही महात्मा गांधींच्या भारताशी हातमिळवणी केली, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या भारताशी नाही. काही शक्ती गांधींच्या भारताला गोडसेचा भारत करण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण आम्ही ते होऊ देणार नाही आणि देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा विरोध करू,” असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.