देशभरात अजुनही करोना विषाणूचा धुमाकूळ सुरुच आहे. भारतात आतापर्यंत ५० हजार पेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झालेली असून दीड हजारापेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. करोनावर ठोस औषध किंवा लस तयार करण्याचे जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप यामध्ये कोणालाही ठामपणे यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. आपल्याला करोना विषाणूशी जुळवून जगणं शिकलं पाहिजे असं अग्रवाल म्हणाले आहेत.

“आपल्याला करोनाशी जुळवून जगणं शिकलं पाहिजे. देशभरात प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरीही देशभरात २१६ जिल्हे असे आहेत जिथे पुन्हा करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही. गेल्या २८ दिवसांमध्ये याव्यतिरीक्त ४२ जिल्ह्यांत कोणतेही नवीन रुग्ण सापडलेले नाहीत. तर इतर महत्वाच्या ३६ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.” लव अग्रवाल पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशातील इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे विभागाने श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केलेली आहे. यातून अडीच लाखपेक्षा जास्त कामगार आपापल्या घरी परतले असल्याचंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. याव्यतिरीक्त देशाबाहेर अडकलेल्या भारतीयांना पुन्हा स्वदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याचं अग्रवाल म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधली परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे करोनाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात नियम अधिक कठोर करण्याचा केंद्राचा विचार असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. या नियमांचं पालन केलं जावं यासाठी प्रत्येक राज्य सरकारशी केंद्रीय आरोग्य मंत्रालय संपर्कात असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.