बिहार भाजपचे प्रमुख सुशील मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेत्यांविरुद्ध आणि लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्यात. यावरून लालूंचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सुशील मोदींना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते गुरूवारी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यादव यांनी म्हटले की, सुशील मोदी सुरूवातीपासूनच खोटं बोलत आहेत. मात्र, प्रत्येक आरोपावर स्पष्टीकरण द्यायला मी सुशील मोदींसारखा बेरोजगार आणि रिकामटेकडा नाही. आम्हाला अनेक महत्त्वपूर्ण कामं करायची आहेत. बिहारच्या विकासासाठी आम्हाला खूप काम करायचे आहे. त्यामुळे कुणीतरी आरोप केल्यानंतर मी प्रत्येक दिवशी स्पष्टीकरण देणे मला शक्य नाही. सुशील मोदींनी आमची माफी मागितली पाहिजे, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले. त्यांनी येत्या दोन दिवसांत आमची माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही तेजस्वी यांनी दिला. सुशील कुमार मोदींना मुख्यमंत्री होता आले नाही म्हणून ते या सर्व गोष्टी करत आहेत. त्यांना वाटत होते की बिहारमध्ये भाजपची सत्ता येईल आणि आपल्याला मुख्यमंत्री करतील. मात्र, तसे घडले नाही. त्याचे शल्य अजूनही त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच सुशील मोदी या सर्व गोष्टी करत असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

भाजप खासदाराने २५ वर्षांपूर्वी लालूंच्या मुलाला दिली होती १३ एकर जमीन

काही दिवसांपूर्वी सुशील मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांना १३ एकर जागा बाहेरच्या व्यक्तीकडून भेट देण्यात आल्याचा आरोप केला होता. बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालू पुत्र तेज प्रताप यादव यांना सन १९९२ मध्ये १३ एकर पेक्षा जास्त जमीन भेट देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय ३ वर्षे होते. तर लालू प्रसाद यादव हे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. शेओहार येथिल सध्याच्या भाजपच्या खासदार आणि राजदचे माजी मंत्री ब्रिज बिहारी प्रसाद यांच्या पत्नी रमा देवी यांच्याकडून एका कराराद्वारे एकूण १३.१२ एकर जागा तेज प्रताप यादव यांच्या नावे भेट देण्यात आली होती. हा करार उर्दू भाषेत करण्यात आला होता.

लालूप्रसाद यादव यांच्या मुलांची संपत्ती जप्त, आयकर विभागाची कारवाई