शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला-राहुल गांधी

राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेत्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटलं

कृषी कायदे रद्द करावेत यासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका केली. कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत? आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी कृषी कायद्यांवर योग्य मंथन झालं नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली. तर कृषी कायदे रद्द करा अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे केल्याचं सीताराम येचुरी यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रपतींसोबत आज पाच नेत्यांच्या शिष्टमंडळाने कृषी कायद्यांबद्दल चर्चा केली. देशाच्या विकासात शेतकऱ्यांचं सर्वाधिक योगदान आहे. केंद्र सरकारने आणलेले कायदे अशा शेतकऱ्यांचं हित साधणारे नाहीत त्यामुळे ते रद्द झालेच पाहिजेत अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. तर कृषी कायदे हे भारताच्या हिताचे नाहीत असं सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे.

२५ पेक्षा जास्त पक्षांनी मोदी सरकारकडे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. या कायद्यांमुळे अन्न सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे असं सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या चौदा दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आता आणखी तीव्र करणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसंच मोदी सरकारने पाठवलेला प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: We informed the president that it is absolutely critical that these antifarmer laws are taken back says rahul gandhi scj