दादरी येथील घटना, विचारवंतांची हत्या या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर देशात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या वातावरणाचा निषेध म्हणून लेखक, इतिहासकार, शास्त्रज्ञ, विचारवंत आदींनी पुरस्कारवापसीचा धडाका लावलेला असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आता या वादात उडी घेतली आहे. ‘सहनशीलता, सहिष्णुता आणि परस्परांबद्दलचा आदरभाव असणे हे खुल्या वातावरणाचे द्योतक आहे. त्यातूनच अर्थव्यवस्थेचा विकास होत असतो. मात्र, विशिष्ट समाजगटाला लक्ष्य करून त्यांच्याविरोधात शिवराळ भाषा वापरणे किंवा त्यांना मारहाण करणे असे प्रकार होत असतील तर त्याला विरोध व्हायलाच हवा’, अशा शब्दांत राजन यांनी केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या.
दिल्ली आयआयटीतील पदवीदान समारंभाच्या पाश्र्वभूमीवर राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, ‘सहनशीलता म्हणजे एखाद्या विचारसरणीमुळे स्वतला असुरक्षित समजून त्या विचारसरणीला आव्हानच न देणे असे नव्हे. या सगळ्यापासून तटस्थ राहणे हे परिपक्व चर्चेसाठी अत्यंत आवश्यक आहे’. सहिष्णुतेबाबत त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले. अमेरिकेत कोणी राष्ट्रध्वज जाळला तर तिथे लगेच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत नाहीत. कारण तेथील समाज तेवढय़ा सहनशीलतेच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे. थोडक्यात एखाद्या समुदायाच्या भावना अधिक सहिष्णु झाल्या आणि त्या सहजासहजी चिथावल्या गेल्या नाहीत तर भावना दुखावल्या जाण्याची कारणे कमी होतील, असे राजन यांनी अखेरीस स्पष्ट केले.
राष्ट्रपतींचे पुन्हा आवाहन
देशातील बहुविधता आणि धार्मिक-जातीय सलोखा राखण्याचे आवाहन करतानाच परंपरेने आलेली सहिष्णुता आणि सामावून घेण्याच्या क्षमतेमुळेच भारत जगभरात आदर्श ठरल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी पुन्हा एकदा केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘सहिष्णुता आणि इतरांना सामावून घेण्याच्या क्षमतेमुळेच आपला देश विकसित झाला आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर या देशाची बहुविधता अक्षय टिकून राहिली आहे. शतकानुशतके होत आलेल्या नागरीकरणाच्या प्रक्रियेत त्यातील बहुसंस्कृती अबाधित आहे. हीच बहुसंस्कृती आपली एकत्रित शक्ती आहे’.

चर्चा, वाद-संवाद आणि आचार-विचार स्वातंत्र्य ही भारताची परंपरा आहे आणि तीच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पोषक व महत्त्वाची आहे. सत्ता आहे म्हणून कोणी आपली विचारसरणी इतरांवर लादायचा प्रयत्न करू शकत नाही. अशा प्रकारांना विरोधच व्हायला हवा.
– रघुराम राजन,
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर

नारायण मूर्ती यांचीही टीका
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही देशातील वाढत्या असहिष्णुतेवर शनिवारी मतप्रदर्शन केले. देशातील अल्पसंख्याकांच्या मनात सध्या एक प्रकारची भीती घर करून आहे, म्हणूनच सरकारने भविष्यात भयमुक्त वातावरण तयार करून त्यांच्यात नवा आत्मविश्वास जागृत करणे आवश्यक असल्याचे सडेतोड मत मूर्ती यांनी व्यक्त केले.

‘सर्वाना समान संधी’ : प्रख्यात संगीतकार झुबीन मेहता यांनीही दिल्लीत बोलताना देशातील वातावरणावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘लेखक, चित्रपट निर्माते या सर्वाना मनातील बोलण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना दडपता कामा नये, अन्यथा ती सांस्कृतिक हुकूमशाही होईल’.