अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता पुन्हा एकदा धमकीवजा इशारा दिला आहे. आता शांतता करार झाला नाही तर संपूर्ण इराण बेचिराख करुन टाकू असं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणने युद्ध थांबवलं नाही तर आम्ही नागरिकांचा विचार करणार नाही. इराणच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांवरही आम्ही हल्ला करु आणि संपूर्ण इराण उद्ध्वस्त करु असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

मागील पाच आठवड्यांपासून युद्ध सुरु

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर २८ फेब्रुवारीला हल्ला केला. त्यानंतर दोन आठवड्यात हे युद्ध संपवून टाकू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र इराणने प्रत्युत्तरादाखल जे हल्ले केले त्यामुळे मागील पाच आठवड्यांपासून हे युद्ध सुरु आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केलं आहे. जगातलं २० टक्के कच्चं तेल ज्या मार्गातून जातं तो हा मार्ग आहे. त्यामुळे हा संघर्ष टीपेला पोहचला आहे. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण इराण बेचिराख करुन टाकू असा इशारा इराणला दिला आहे. एवढंच नाही शांती करार केला नाही तर तुमचे उर्जा प्रकल्प, पायाभूत सुविधा मंगळवारी उडवून टाकू असा इशाराही ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे ठरेल. यापेक्षा दुसरं काहीही नसेल. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अथवा तुम्ही नरकात जाल. तुम्ही पाहतच बसा”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

इराण आणि अमेरिका युद्ध आणखी आठ आठवडे सुरु राहणार?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिगणी पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यादरम्यान युद्धाला पाच आठवडे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीनच तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेले युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावं लागणार आहे.