Donald Trump on Iran Attack Statement: इराणवर दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला करण्याची तयारी केली होती, पण हल्ला करण्याऐवजी अखेरच्या क्षणी त्यांच्याशी चर्चा केली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. लास वेगासमधील एका कार्यक्रमात बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने लष्करी कारवाईच्या माध्यमातून इराणला कमकुवत केले आहे. त्यानंतर आता इराण वाटाघाटी करण्यासाठी तयार झाला आहे.

लास वेगासमधील कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने सर्वात मोठा हल्ला करण्याचे नियोजन केले होते. मात्र हल्ल्याच्या काही वेळापूर्वी इराणी अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. “इराणी अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितले की, कृपया असे करू नका. आपण चर्चा करूया”, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेने सातत्याने निर्माण केलेल्या लष्करी दबावामुळे हे शक्य झाले, असेही ट्रम्प म्हणाले.

अमेरिका आता इराणशी राजनैतिक चर्चेसाठी तयार असली तरी इराणच्या अण्वस्त्राच्या महत्त्वाकांक्षेबाबत आमची भूमिका बदललेली नाही. मला लोकांना मारायचे नाही, त्यामुळे मी करार करणे पसंत करेन. पण अण्वस्त्र सज्ज होऊ शकत नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याबाबतची चर्चा निर्णायक वळणावर असल्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने काही काळापूर्वी दिल्यानंतर आता ट्रम्प यांची ही नवी टिप्पणी समोर आली आहे. याबाबत एका वेगळ्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी या आठवड्यात कराराची घोषणा होऊ शकते, असे म्हटले होते.

इराणने काय म्हटले?

होर्मुझच्या कराराबाबत बोलताना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले, इराण आणि ओमान हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा व्यापारी जलमार्गाच्या कराराचा मसुदा तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही देशांनी या प्रक्रियेत अडथळा आणला नाही तर लवकरच आम्ही संयुक्त निवेदन प्रसिद्ध करू शकतो.

असोशिएटेड प्रेसने सूत्रांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले की, इराण आणि ओमानने वाटाघाटीचा मसुदा अंतिम केला असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांच्या मंजुरीची वाट पाहिली जात आहे. मात्र या कराराबाबत अमेरिका आणि इराण यांच्या काही प्रमाणात मतभेद आहेत. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचा आग्रह धरला आहे. तर अमेरिकेने त्यास विरोध दर्शवला आहे.