भारताचं अविभाज्य अंग असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरी राग आवळला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचं स्वागत करतानाच पंतप्रधान खान यांनी “काश्मीरचा मुद्दा युनोच्या ठरावानुसारच सोडवण्यात यावा. काश्मीरी नागरिक त्यांचा निर्णय घेईपर्यंत पाकिस्तान सर्वोतोपरी त्यांच्या पाठिशी राहिल,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत जम्मू काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर पुन्हा चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून स्वागत केलं आहे. “जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचं स्वागत. आतंरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला जम्मू काश्मीरचा प्रश्न सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यावर आहे. परिषदेने केलेली चर्चेमुळे परिस्थितीचं गांर्भीय दिसून येतं. जम्मू काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावानुसार आणि तेथील जनतेच्या मतानुसार सोडवला जावा. काश्मीरी जनता त्यांचा निर्णय घेईपर्यंत त्यांच्या निर्णय घेण्याच्या अधिकारासाठी पाकिस्तान मानसिक, राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा देत राहिल,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार ३७० कलम रद्द केलं. त्याचबरोबर जम्मू, काश्मीर आणि लडाख असं तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच महिन्यापासून काश्मीरमधील परिस्थिती वारंवार चर्चेत येत आहे.