US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध अद्यापही सुरू आहे. या युद्धाचा अनेक देशांवर मोठा परिणाम होत आहे. मात्र, तरीही युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. अमेरिका-इराण युद्ध कधी थांबणार? की हे युद्ध आणखी भडकणार? याबाबत आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण एकीकडे युद्धविरामाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे वक्तव्य करून इराणला धमकीवजा इशारा देत आहेत.

यातच आज अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानला पश्चिमेकडील करज शहराशी जोडणाऱ्या एका महामार्गावरील एका मोठ्या पुलावर भीषण हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओही ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. तसेच याआधी अमेरिकेने इराणमधील पॉवर प्लांट उडवण्याची धमकीही दिली होती. अमेरिकेच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता इराणने अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. ‘आखातातल्या सगळ्या अमेरिकी कंपन्या जमीनदोस्त करू’, असा इशारा इराणी सैन्यांनी अमेरिकेला दिला.

इराणी सैन्यांनी काय इशारा दिला?

“आखातातील सर्व आयसीटी (ICT) कंपन्या अजूनही लक्ष्य आहेत. जर अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांसंबंधीच्या धमक्यांची अंमलबजावणी केली, तर आम्ही देखील प्रत्युत्तर देऊ. यामध्ये झिओनिस्ट राजवटचे सर्व वीज प्रकल्प, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, तसेच या आखातातल्या अमेरिकन भागधारक असलेल्या सर्व कंपन्यांचा संपूर्ण नायनाट केला जाईल. आमच्या नजरेपासून काहीही लपलेलं नाही”, असा इशारा इराणच्या खतम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी

अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा एकदा संयुक्त हल्ला करत पश्चिम आशियातील सर्वात उंच पुलांपैकी एक असलेल्या इराणमधील कराज येथील एक पूल उद्ध्वस्त केला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. “खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करार करावा. इराण अजूनही एक महान राष्ट्र बनू शकतं. पण काहीही शिल्लक न राहण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

इराणची राजधानी तेहरानला पश्चिमेकडील करज शहराशी जोडणाऱ्या महामार्गावरील एका मोठ्या पुलावर अमेरिकेने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्या पुलाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे.