US President Donald Trump and India PM Narendra Modi meeting: “पंतप्रधान मोदी पदावर असताना भारतावर जर हल्ला झाला, तर आम्ही भारताच्या मदतीसाठी धावून येऊ”, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जवळपास १६ महिन्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्वीपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना भारताशी असलेल्या सामरिक संबंधांबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दर्शवला.

मोदी पंतप्रधान असेपर्यंत…

भारत आणि अमेरिकेत यांच्यात सामरिक संबंध कसे आहेत? या प्रश्नाचे उत्तर देत असताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटते आमच्यात उत्तम संबंध आहेत. जर भारतावर हल्ला झाला तर आम्ही त्यांच्या मदतीसाठी धावून जाऊ. जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या मदतीसाठी तिथे जाऊ. पण जर इतर नेते असतील तर त्यांच्याबाबत मी आताच सांगू शकत नाही.”

पंतप्रधान मोदी जोपर्यंत भारताचे प्रमुख आहेत, तोपर्यंत भारताची पश्चिम आशियात महत्त्वाची भूमिका असेल, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

इराणविरोधातील युद्धादरम्यान ओमानच्या आखातात अमेरिकेच्या हल्ल्यात भारताच्या तीन खलाशांचा मृत्यू झाला. याबाबत प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “हो मी त्यांच्या मृत्यूबाबत ऐकले. हा व्यवसाय खूप खडतर आहे. तरीही आम्ही एकत्र काम करू. आम्ही त्या सर्वांवर प्रेम करतो.”

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली होती चिंता

“आम्ही नेहमीच व्यावसायिक सागरी प्रवासाच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिले आहे. सागरी व्यापाराच्या क्षेत्रात भारतातील लाखो खलाशी कर्तव्य बजावत आहेत. त्यांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. मला खात्री आहे की, इराण करारामध्ये खलाशांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल आणि त्याला प्राधान्य दिले जाईल”, असे पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय बैठकीत सांगितले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या जलमार्गाचे खुले राहणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले. तसेच या मार्गात शांतता कायम राहिल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा

या बैठकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांचे वाटाघाटी करण्याचे कौशल्य उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले. “तुम्ही या व्यक्तीकडे बघा. तो एका देवदुतासमान दिसतो. यांच्यासारखे खूप कमी लोक असतात. लोक म्हणतात की, ते (मोदी) चांगले व्यक्ती आहेत. पण मी म्हणेण की, ते तेवढेच कणखर व्यक्ती आहेत. ते एक उत्तम वाटाघाटी करणारे व्यक्ती आहेत. त्यांच्या मनात भारतीयांबद्दल खूप प्रेम आहे. तेवढेच प्रेम अमेरिकेबद्दलही त्यांना वाटते”, असेही ट्रम्प म्हणाले.

“मोदी शांत, संयमी आणि जबरदस्त कामगिरी करणारे ‘किलर’ व्यक्ती आहेत. मी मोदींसारखा नाही”, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.