जगातील टॉप १५ श्रीमंत शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी अर्थात मायानगरी मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईची संपत्ती ९५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर अव्वल स्थानी आहे.

‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यात जगातील श्रीमंत शहरं आणि अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई १२ व्या स्थानी आहे. तर न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे. न्यूयॉर्कची संपत्ती सुमारे तीन लाख कोटी डॉलरच्या घरात आहे. तर २.७ लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले लंडन दुसऱ्या स्थानी आहे. २.५ लाख कोटी डॉलरची संपत्ती असलेले टोकियो तिसऱ्या आणि २.३ लाख कोटी डॉलर्सची संपत्ती सॅन फ्रान्सिस्को चौथ्या स्थानी आहे. चीनमधील बिजिंग हे शहर २.२ लाख कोटी डॉलरसह पाचव्या स्थानी आहे. ९५० अब्ज डॉलरसह मुंबई १२ व्या स्थानी असून टॉरोन्टो, फ्रँकफर्ट, पॅरिस या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे.

अहवालात मुंबईवर भाष्य करण्यात आले. ‘मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजही मुंबईतच आहे. जगातील १२ व्या सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये याचा समावेश होतो. आर्थिक सेवा, रिअल इस्टेट आणि मीडिया हे मुंबईतील आघाडीचे उद्योग असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अहवालात जगातील अब्जाधिशांची यादीही देण्यात आली आहे. मुंबईत तब्बल २८ अब्जाधीश असल्याचे समोर आले आहे. मेलबर्न, सेऊल, ओसाका, जिनेव्हा या शहरांचा यादीत समावेश झालेला नाही. गेल्या १० वर्षांमध्ये मुंबई, सिडनी, शांघाय या शहरांमधील संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होत गेली, असेही यात म्हटले आहे.