पीटीआय, जम्मू : जम्मूतील आंतरराष्ट्रीय रेषेनजीक राबवलेल्या विशेष शोधमोहिमेत सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुवारी शस्त्रे व दारूगोळय़ाचा मोठा साठा जप्त केला. यानंतर सैन्याला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी भारतीय हद्दीत शस्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार सैन्य दक्ष होते आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील त्रिस्तरीय सीमा कुंपणानजीक नियमित गस्त घालत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अखनूरमधील परगवाल सब-सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या कुंपणालगत घालण्यात आलेल्या गस्तीत शस्त्रे व दारूगोळय़ाने भरलेली एक बॅग हस्तगत करण्यात आली. यात एक एके-४७ रायफल, इटलीत तयार झालेली दोन पिस्तुले, त्यांची ४० काडतुसे व ४ मॅगझिन यांचा समावेश होता. पाकिस्तानातून आलेली ही शस्त्रसामग्री भारतात पोहोचू न देऊन सैन्याने एक मोठा घातपात टाळला, असे अधिकारी म्हणाले. आपल्या सैनिकांनी पुन्हा एकदा पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा कुटिल डाव हाणून पाडला आहे, असे बीएसएफचे महानिरीक्षक एस.के. सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.