US-Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला चार आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. या युद्धाचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू असून पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला. मात्र, अमेरिकेचा हा प्रस्ताव इराणला मान्य नसल्याने आता हे युद्ध समाप्त होणार की पुन्हा भडकणार? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.

युद्धबंदीच्या चर्चा सुरू असतानाच आता इराणने आज अमेरिकेला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इराणमधील इंग्रजी दैनिक ‘तेहरान टाइम्स’च्या पहिल्या पानावर ‘Welcome To Hell’, अशा मथळ्याखालील वृत्तातून अमेरिकेला इशारा दिला आहे.

‘इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणारा कोणताही अमेरिकी सैनिक शवपेटीतूनच परत जाईल’, असाही इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. दरम्यान, अमेरिकेने मध्यपूर्वेत आणखी १०,००० सैनिक तैनात करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या चर्चा आहेत. तसेच या संभाव्य हालचालीमुळे अमेरिका इराणमध्ये थेट लष्करी कारवाई करण्याच्या चर्चा समोर आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला हा इशारा दिल्याचं बोललं जात आहे.

इराणच्या अध्यक्षांचा आखाती राष्ट्रांना मोठा इशारा

युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटींवर चर्चा सुरू असतानाच इराणने आखाती राष्ट्रांना पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आखाती राष्ट्रांबाबत एक महत्वाचं भाष्य केलं आहे. मसूद पेझेश्कियान म्हणाले की, “आम्ही वारंवार सांगितलं आहे की इराण पूर्वनियोजित हल्ले कधीही करत नाही. जर आमच्या पायाभूत सुविधा किंवा आर्थिक केंद्रांना लक्ष्य केलं गेलं तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. तसेच या प्रदेशातील देशांनो, जर तुम्हाला विकास आणि सुरक्षा हवी असेल तर आमच्या शत्रूंना तुमच्या भूमीवरून युद्ध करू देऊ नका”, असा इशारा इराणचे अध्यक्ष डॉ.मसूद पेझेश्कियान यांनी दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत कडक भूमिका मांडली. इराणी प्रतिनिधींच्या वागणुकीवर तीव्र शब्दांत टीका केली. इराणचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी अत्यंत “वेगळे” आणि “विचित्र” असल्याचे त्यांनी नुकतंच म्हटलं होतं. ट्रम्प म्हणाले, वाटाघाटी करणारे इराणचे अधिकारी वेगळे आणि विचित्र आहेत. लष्करीदृष्ट्या इराणचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या पुनरागमनाची शक्यता सध्या शून्य आहे. अशा परिस्थितीत इराण करारासाठी अमेरिकेकडे “विनवणी” करत असून जी त्यांनी करायलाच हवी, मात्र सार्वजनिकरित्या ते केवळ अमेरिकेच्या प्रस्तावावर “विचार करत असल्याचे” भासवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. इराणने लवकरात लवकर या प्रक्रियेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जर वेळ निघून गेली, तर पुन्हा मागे फिरता येणार नाही आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती कोणासाठीही “सुखद” नसेल.

पाकिस्तानची शांतता चर्चेसाठी मध्यस्थी

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला असून शाहबाज शरीफ यांनी एक पोस्ट देखील एक्सवरुन केली होती. त्याचा स्क्रिनशॉट खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला. आता या चर्चेतून दोन्ही देशांतील संघर्ष समाप्त होणार की दोन्ही देशांनी मांडलेल्या अटींवरुन या चर्चा फिसकटणार याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.