Dubai Job Scam Punjab Youth Rescued Case: कुटुंबावरील कर्ज कमी व्हावे, आपल्या आई-वडिलांना चांगले दिवस पाहायला मिळावे म्हणून प्रत्येक कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी आपापल्या परिने मेहनत करत असतो किंवा करत असते. पंजाबच्या जालंधरमधील एक युवक उज्ज्वल भविष्यासाठी चार महिन्यांपूर्वी दुबईला गेला होता. तिथे काही पैसे कमावून कुटुंबाला आधार देऊ, असा त्याचा विचार होता. मात्र दुबईत गेल्यानंतर त्याच्याबरोबर जे झाले, ते अतिशय धक्कादायक होते. ज्या कंपनीत तो पैसे कमावण्यासाठी गेला. त्या कंपनीने त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतला. त्याला कामाचा मोबादला न देता गुलामासारखे वागवत युद्धजन्य परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले. अखेर त्याची सुटका कशी झाली? हे जाणून घेऊ.

जालंधर जिल्ह्याच्या सोफी गावातील लवप्रित सिंग नावाचा तरुण आपल्या आई-वडिलांबरोबर राहतो. कुटुंबावर असलेला कर्जाचा भार हलका व्हावा, यासाठी त्याने दुबईत जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दुबईत गेल्यानंतर सुरुवातीचा काळ त्याचा जम बसावा आणि त्याचा रोजचा खर्च भागावा, यासाठी कुटुंबाने भारतातून त्याला पैसे पाठवले. पण लवप्रित मात्र कुटुंबाला काहीच पाठवू शकला नाही.

दुबईतील कठीण प्रसंगाबाबत सांगत असताना लवप्रित म्हणाला, दुबईत मला पॅकेजिंगचे काम दिले जाईल, असे आमिष दाखविण्यात आले. दोन महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर मी दुबईत गेलो. दरमहा १,३०० दिराम्स (भारतीय चलनात ३३,०००) मिळतील, असे आश्वासन देण्यात आले. पण दुबईत गेल्यानंतर मला स्टील फॅक्टरीत अतिशय बिकट परिस्थितीत काम करण्यासाठी भाग पाडले गेले.

चार महिने अतिशय कठीण परिस्थितीत काम करूनही कंपनीने मला वेतन दिले नाही, तसेच माझा पासपोर्टही परत केला नाही. जेव्हा जेव्हा मी माझ्या वेतनाचा विषय काढायचो, तेव्हा कंपनीचे अधिकारी मला धमकी द्यायचे, याचे परिणाम वाईट होतील, अशी भीती घालायचे.

लवप्रितची प्रकृती खालावल्यानंतर आणि त्याच्याशी बोलणे कमी झाल्यानंतर पालकांना संशय आला. त्यांनी राज्यसभेचे खासदार बलबीर सिंग सीचेवाल यांची ६ एप्रिल रोजी भेट घेतली. आपल्या मुलाची मदत करा, अशी विनंती त्यांनी केली. खासदार सीचेवाल यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. यानंतर दुबईमधील भारतीय दूतावासाने या प्रकरणात लक्ष घालून लवप्रितला शोधून भारतात पाठवले.

लवप्रित भारतात आल्यानंतर त्याने सीचेवाल यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. खासदार सीचेवाल यांनी पंजाबमधील युवकांना यानिमित्ताने आवाहन केले की, विदेशात नोकरी करण्यासाठी जात असताना खबरदारी घ्यावी. झटपट नोकरी मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करू नये. तसेच एजंटकडून नोकरीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्याची काळजीपूर्वक तपासणी करावी. लवप्रितच्या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ लक्ष घालून कारवाई केल्याबद्दल त्यांनी मंत्रालयाचे आभार मानले.

मिर्झापूरचा मर्चंट नेव्ही अधिकारी अमेरिकेत बेपत्ता

विदेशात नोकरी करणाऱ्या आणखी एका तरुणाची बातमी समोर आलेली आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरचा रहिवासी असलेला २५ वर्षीय मनीष द्विवेदी अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. मनीष मर्चंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर या पदावर काम करतो. ६ मे रोजी फिलाडेल्फियाच्या बंदरावर उतरल्यानंतर तो एका मॉलमध्ये गेला होता. मात्र तिथून तो त्याच्या जहाजावर पोहोचलाच नाही. ७ मे रोजी जहाजावरील अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी फोन करून तो बेपत्ता झाल्याची माहिती दिली.

Merchant Navy Officer Missing In America
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा मनीष द्विवेदी ७ मे पासून बेपत्ता आहे.

लवप्रितच्या प्रकरणाप्रमाणे मनीषचे आई-वडिलही आता परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मुलाचा १५ दिवसांपासून कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे मुलाला शोधण्यात केंद्र सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी द्विवेदी कुटुंबाने केली आहे.