हिंदी भाषा ही इंग्रजीला पर्याय म्हणून वापरायला हवी, स्थानिक भाषांना नाही या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेते प्रकाश राज यांनीही अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून आपल्याला हिंदीची बळजबरी नको, आमची ओळख जपायची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे पश्चिम बंगालमधले खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, आम्ही हे स्वीकारू शकत नाही. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?


वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिला.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की सरकार चालवण्याचे माध्यम हे राजभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल. आता वेळ आली आहे की राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची.

हेही वाचा -“We dare you…”; अभिनेते प्रकाश राज यांचं गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयीचं ट्विट चर्चेत

जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेत असले पाहिजे, ”असे शाह यांनी संसदीय अधिकृत भाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत सांगितले. शाह यांनी हिंदी भाषा ही इंग्रजीला पर्याय म्हणून वापरायला हवी, स्थानिक भाषांना नाही, असे स्पष्ट केले. इतर स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.