एएनआय, नवी दिल्ली
पश्चिम आशियातील युद्धात १० भारतीय खलाशांसह एकूण १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७५ जण जखमी झाल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली. मृतांमध्ये ओमानमधील ८, संयुक्त अरब अमिरातीलमधील ४, कुवेत, सौदी अरेबिया आणि इराकमधील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे. जखमींमध्ये संयुक्त अरब अमिरातीतील ३२, ओमानमधील २४, कुवेतमधील १३, कतारमधील चार, सौदी अरेबियातील एक आणि इस्रायलमधील एका भारतीयाचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.
सिंह यांनी सांगितले, कतारमधील रास लाफान गॅस प्रकल्पात झालेल्या वेगळ्या अपघातात १२ भारतीयांचा मृत्यू झाला होता. तसेच, तेहरानमधील भारतीय दूतावासाने २,५५७ भारतीयांना इराणमधून आर्मेनिया आणि अझरबैजानमार्गे सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचे त्यांनी नमूद केले. जखमी भारतीयांना स्थानिक रुग्णालयांत उपचार मिळाले. भारतीय दूतावासांनी स्थानिक प्रशासन आणि रुग्णालयांशी सतत संपर्क ठेवून उपचार, कुटुंबीयांशी संपर्क, प्रवासाची व्यवस्था आणि भारतात परतण्यास आवश्यक ती मदत केल्याचेही सरकारने स्पष्ट केले. युद्धक्षेत्रात मृत्यू झालेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना ‘डीजीएमए कल्याण योजना’ अंतर्गत १० लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. आवश्यक पडताळणीनंतर ही रक्कम मृतांच्या निकटवर्तीयांना दिली जाते, असे भरपाईबाबत सरकारने सांगितले. याशिवाय, सामूहिक करारांनुसार अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना १२ लाख रुपये, तर ‘नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया’मार्फत १० लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त भरपाईची तरतूद आहे. जहाजाच्या विमा संरक्षणातून मिळणाऱ्या भरपाईसाठी संबंधित भरती संस्था विमा कंपनीकडे दावा दाखल करते.
१६ मृतांपैकी ५ जणांच्या कुटुंबीयांना भरपाईची रक्कम यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. कतारमधील गॅस प्रकल्पातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’तून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र, कतार सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भरपाईची माहिती भारत सरकारकडे उपलब्ध नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
विशेष उड्डाणांची व्यवस्था
संकटकाळात भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी दूतावासांनी स्थानिक प्रशासन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या समन्वयाने व्यावसायिक तसेच विशेष उड्डाणांची व्यवस्था केली. गरजेनुसार शेजारील देशांमार्गे ‘ट्रान्झिट व्हिसा’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
