West Bengal Assembly Dissolved and Mamata Banerjee Government dismissed by Governor following election results : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. कारण पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकार अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. म्हणजेच, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या ममता बॅनर्जी आता बंगालच्या मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत.

भारतीय संविधानाचे कलम १७४ (२)(बी) अंतर्गत मिळणाऱ्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत राज्यपालांनी मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. अधिकृत नोटीसमध्ये आर.एन. रवी यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीला मोठा पराभव सहन करावा लागला असून भाजपाने बहुमत मिळवले आहे. मात्र या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली आहे, तर मी राजीनामा का देऊ? म्हणत मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला होता.

“मी राजीनामा देणार नाही. कारण मी निवडणूक हरलेली नाही. मी राजभवनात जाणार नाही. कारण हा प्रश्नच उद्भवत नाही. मला हेही सांगायचं आहे की आम्ही निवडणुका हरलेलो नाही. हा आम्हाला पराभूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाशी संगनमत करून ते आम्हाला पराभूत करत असतील, पण नैतिकदृष्ट्या आम्ही निवडणुका जिंकल्या आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

४ मे रोजी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपाने २०७ जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठला आहे, तर टीएमसीला ८० जागांवर विजय मिळाला आहे.

आता मुख्यमंत्री कोण होणार?

दरम्यान ८ मे रोजी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यामध्ये पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाईल. २०२१ मध्ये भाजपाने सुवेंदु अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली होती आणि त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली होती. आता भाजपा ज्याची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करेल, तीच व्यक्ती राज्याची पुढील मुख्यमंत्री बनेल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.