पश्चिम बंगालचे राजकारण सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांभोवती फिरत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलची गेल्या १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपने जणू कंबर कसली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दौरे केले. सुवेंदू अधिकारी, सुकांता मजूमदार, दिलीप घोष, निसित प्रामाणिक अशी प्रादेशिक नेत्यांची फौज पक्षाकडे आहे.
पण ममता बॅनर्जी यांच्या तोडीचा नेता सध्या तरी राज्यात इतर कोणत्याच पक्षाकडे नाही. तृणमूल काँग्रेसच्या पक्षाची धुरा खुद्द ममतादीदींच्या खांद्यावर असली तरी त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी हाही पक्षाचा महत्त्वाचा चेहरा आहे. एकेकाळी अपराजित मानल्या जाणाऱ्या डाव्या पक्षांचा प्रभाव आता केवळ काही मोजक्या भागांमध्ये शिल्लक उरला आहे. काँग्रेसचीही वेगळी गत नाही. कित्येक दशकांपासून हा पक्ष राज्यात संघटनेअभावी ‘कमकुवत’ याच श्रेणीत गणला जात आहे.
भाजपने नेहमीप्रमाणे हिंदुत्वाभोवती निवडणूक केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा प्रत्येक सभेत उपस्थित केला जात आहे. त्याशिवाय राज्यातील भ्रष्टाचार, उद्योगांची गरज, पायाभूत सुविधा हे मुद्देही भाजपने चर्चेत ठेवले. मात्र, लोकसभेत मतदारसंघा फेररचनेसंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक पराभूत झाल्यापासून भाजपने स्वतःला महिलांचा तारणहार असल्याचे दाखवण्यासाठी तृणमूलविरोधात आरोपांची राळ उठवली आहे.
प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसकडे सर्वाधिक महिला खासदार आणि आमदार असल्याने या मुद्द्यावरून भाजपला सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्यात कितपत यश येईल यात शंका आहे. तृणमूलच्या दृष्टीने मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) हा प्रमुख प्रचाराचा आणि चिंतेचा विषय आहे. राज्यातील तब्बल ९१ लाख मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या समर्थकांचा समावेश असल्याचा तृणमूलचा दावा आहे. पण निवडणूक आयोगाने त्यांना दाद दिलेली नाही. त्यातच निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यस्तरीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्यामुळे निवडणुकीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्याचे आरोप होत आहेत.
पहिल्या टप्प्यात भाजपसाठी सोपा पेपर?
- पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील अलिपूरद्वार, कूचबिहार, जलपैगुडी या जिल्ह्यांसह जंगल महलचा काही भाग आणि दक्षिणेकडील काही मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या सर्व भागात भाजपने गेल्या दशकभरात आपले पाय रोवले आहेत.
- भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये खऱ्या अर्थाने यश मिळायला सुरुवात झाली. त्या निवडणुकीत भाजपने ४२पैकी १८ जागांवर विजय मिळवताना जवळपास ४० टक्के मतदारांची पसंती मिळवली होती. २०२४च्या निवडणुकीत जागा (१२) आणि मतांचे प्रमाण (३९ टक्के) घटले.
- पण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपने आपले स्थान बळकट केले. २०२१च्या निवडणुकीत तृणमूलने ४८ टक्के मते घेत २१३ जागांवर विजय मिळवला. तर भाजपने ३८ टक्के मतांसह ७७ जागांवर विजय मिळवला होता.
आकडेवारी
पश्चिम बंगालच्या विधानसभेचे एकूण संख्याबळ २९४ इतके आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला १५२ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिलला १४२ जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी २,९००पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे १,४७० उमेदवार आहेत. त्यात भाजपने सर्व म्हणजे १५२ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. तर तृणमूल काँग्रेसचे १४८ उमेदवार आहेत.
