गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडलं. मात्र, २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या दरम्यान १५ केंद्रांवर ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत या १५ केंद्रांवर फेर मतदानाचे निर्देश दिले होते.

त्यानंतर आज (२ मे) पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील एकूण १५ केंद्रांवर फेर मतदान घेण्यात आलं आहे. या फेर मतदानादरम्यान देखील काही मतदान केंद्रांवर टीएमसी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे.

तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याने काही वेळ या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि काही लोकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर अखेर येथील तणावाची परिस्थिती नियंत्रणात आली. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

वृत्तानुसार, आज सकाळी मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही घटनेविना फेरमतदान सुरू झालं आणि दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघांमध्ये ७२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं आहे. मात्र, याच फेर मतदानादरम्यान भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाच्या काही समर्थकांनी आपल्याला मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप केला, तर दुसरीकडे टीएमसीच्या काही समर्थकांनी भाजपावर निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप केला. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण वाद निवळत नसल्याने पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला.

टीएमसीविरोधात स्थानिकांचं आंदोलन

दरम्यान, पश्चिम बंगालच्या फाल्टामधील हाशिम नगर भागातील काही स्थानिकांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून छळ होत असल्याचा आरोप करत मोठं आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र, फाल्टा येथील टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर या ठिकाणी देखील सीआरपीएफच्या पथकाने मोठ्या फौजफाट्यासह परिसराला भेट दिली आणि आंदोलकांना त्यांच्या सुरक्षेची हमी दिली.

पश्चिम बंगालमधील ‘त्या’ १५ केंद्रांवर पुन्हा मतदान का घेण्यात आलं?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन करणार की, भाजपाच्या परिवर्तनाच्या हाकेला जनता प्रतिसाद देणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पाच मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपा बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दोन चाचण्यांनी मात्र सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाच पूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत केले आहे. यादरम्यान मतमोजणीसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना निवडणूक आयोगाकडून राज्यातील दोन मतदारसंघातील एकूण १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले आहे.

फेरमतदानाचे निर्देश कशासाठी?

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानादरम्यान काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत फेरफार झाल्याच्या तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगाने दोन मतदारसंघांतील एकूण १५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्यामध्ये मग्रहाट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या फेरमतदानाची संबंधित मतदान केंद्रांच्या परिसरात जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून मतदारांना याची माहिती मिळेल, असे निर्देशही देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व भौतिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच निवडणूक निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालांच्या आधारे हे फेरमतदान घेतले जात असल्याचे आयोगाने सांगितले आहे.