कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होत आहे. मात्र, निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर २४ परगणा जिल्ह्यात नोआपारा मतदारसंघातील घराबाहेर गोळीबार केल्याची तक्रार नेते भाजप नेते कुंदन सिंग यांनी केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात जेथे मतदान यंत्र होते त्या परिसरात भाजपचा झेंडा असलेल्या दोन वाहनांना प्रवेश दिल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यात कुंदन सिंग या भाजप नेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी रविवारी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सोमनाथ श्याम यांनी भाजपचे आरोप फेटाळले आहेत. लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी गोळीबाराचा हा बनाव रचल्याचा दावा त्यांनी केला. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपने केली.
‘तृणमूल’चे आंदोलन
* केवळ भवानीपूरच नव्हे, तर राज्यातील इतर भागांतही तणाव पाहायला मिळत आहे. कोलकात्यात खुदीराम केंद्र येथील मतमोजणी केंद्राबाहेर शशी पांजा आणि कुणाल घोष या तृणमूलच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केले.
* टपाल मतपत्रिकांची अनधिकृतपणे हाताळणी केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, हावडा येथे स्ट्रॉँगरूमशेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केल्यावर टीएमसीने विरोध केला, त्यानंतर आयोगाने ते काम तात्पुरते थांबवले.
* आसनसोल आणि बारासात येथे सीसीटीव्ही कॅमेरे काही मिनिटांसाठी बंद केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
४३२ मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील सर्व २९४ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४३२ मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
पोटनिवडणुकीवरून भाजपला आव्हान
* निवडणूक आयोगाने गंभीर निवडणूक गुन्हे घडल्याचे सांगत फालता विधानसभा मतदारसंघातील मतदान रद्द केल्यानंतर, आता २१ मे रोजी तिथे फेरमतदान होणार आहे. * या पार्श्वभूमीवर, तृणमूल काँग्रेसने रविवारी भाजपला आपली संपूर्ण यंत्रणा वापरून ही जागा जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले आहे.
