नवी दिल्ली : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पश्चिम बंगालमधील लढतींसह आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. काही तासांमध्ये निकालांची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा असून हे निकाल केवळ या राज्यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणार नसून देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाच राज्यांतील ८२४ विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आले तर ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील. ही निवडणूक ममता बॅनर्जींच्या राजकीय भवितव्याची लढाई मानली जात आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजपला बहुमत मिळाले तर केंद्रातील सत्ताधारी पक्षासाठी पश्चिम बंगालमधील सत्ता पहिल्यांदा काबीज करणे हा अभूतपूर्व विजय ठरेल. बहुतांश मतदानोत्तर चाचण्या भाजपच्या विजयाचा अंदाज बांधत असल्या तरी सोमवारचा निकाल अत्यंत नाट्यपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

मतदार याद्यांची सखोल आणि विशेष  फेरतपासणी मोहीम (एसआयआर), हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण, महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी योजनांची खैरात, बंगाली अस्मिता अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकीय प्रतिष्ठाही पणाला लागली होती.

भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात त्यांचे प्रमुख स्पर्धक व भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी मैदानात उतरले आहेत. गेल्यावेळी अधिकारी यांच्या घरच्या मैदानात म्हणजे नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींनी त्यांना आव्हान दिले होते. त्या लढतीमध्ये ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला होता. यावेळीही अधिकारी यांच्या विरोधातील भवानीपूरमधील लढतही तितकीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. भवानीपूरमधील निकालावर पश्चिम बंगालचेही राजकीय भवितव्य निश्चित होईल असे मानले जाते.   

संपूर्ण निवडणूक प्रचार आणि दोन टप्प्यांतील मतदानामध्ये पश्चिम बंगाल हे राजकीय तणावाचे केंद्रस्थान बनले होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यातील तीव्र लढतींमध्ये साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला गेल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून झाला. मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी हिंसाचाराच्याही घटना झाल्या. फाल्टा मतदारसंघातील २८५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असून तिथे २४ मे रोजी मतदान होईल. त्यामुळे सोमवारी पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैकी २९३ जागांचेच निकाल जाहीर होतील.

विजयच्या कामगिरीकडे लक्ष

तमिळनाडूमध्ये, सत्ताधारी ह्य्द्रमुकह्ण आघाडीला सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळण्याचे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांतून व्यक्त झाले आहेत. मात्र, अभिनेता विजय यांच्या  ह्य्तमिळगा वेट्री कळघमह्ण (टीव्हीके) पक्षामुळे यंदाची लढाई तिहेरी आणि तितकीच चुरशीची झाली. पदापर्णातच ह्य्टीव्हीकेह्णची कामगिरी दमदार राहण्याची शक्यता असून एका मतदानोत्तर चाचणीमध्ये या पक्षाला १२० जागादेखील मिळण्याचे भाकीत केले गेले आहे. त्यामुळे अण्णाद्रमुक व भाजपची विरोधी आघाडी फारशी तग धरू शकणार नसल्याचे मानले जात आहे.

आसाममध्ये, बहुतेक  मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार भाजप सहजपणे सलग तिसर्‍यांदा  सत्तेत परत येईल असे दिसते. १२६ सदस्यांच्या विधानसभेत भाजप आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल. पुद्दुचेरी विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील ह्य्एनडीएह्ण आघाडी पुन्हा सत्तेत येईल, तर, काँग्रेस-द्रमुक आघाडीची संधी हुकण्याची शक्यता आहे. केरळमध्ये डावी ह्य्एलडीएफह्ण आघाडी व काँग्रेसच्या ह्य्यूडीएफह्ण आघाडी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित असल्याने एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता नाही. मात्र, अंदाजांनुसार काँग्रेसची ह्य्यूडीएफह्ण आघाडी किंचित आघाडीवर आहे. विजयाचे अंतर कमी असल्याने अनपेक्षित निकालांचीही शक्यता आहे.

 मतमोजणीशी संबंधित अद्ययावत माहिती (रीअल टाइम अपडेट) निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच मोबाइल ॲपवर (ईसीआयनेट) उपलब्ध असेल.

तृणमूल काँग्रेसचा आरोप

* मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा तसेच, विनापरवानगी मतपत्रिकांची मोजणी केली गेली व फेरफार केला गेल्याचाही आरोप तृणमूल काँग्रेसने केला.

* निकालानंतर हिंसाचार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून अनुचित घटना रोखण्यासाठी निमलष्करी दले पुढेही एखाद-दोन महिने तैनात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.