नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतील गडबडीमुळे झाला की, हिंदूंच्या ध्रुवीकरणामुळे याबाबत परस्परविरोधी मते उमटू लागली आहेत. ‘एसआयआर’मध्ये वगळलेले २७ लाख मतदार त्रिशंकू अवस्थेत राहिले. एकूण मतदारांमध्ये हे प्रमाण ४.३ टक्के होते. तर, भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा ४.६ टक्के मते जास्त मिळाली. त्रिशंकू मतदारांना मतदान करता आले असते तर भाजपला पश्चिम बंगाल ताब्यात घेता आले असते का, असा प्रश्न विचारला जात आहे.
पश्चिम बंगालमधील गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारी आणि २०२६ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची विभागणी पाहता ‘एसआयआर’मधील गोंधळामुळे भाजपला मिळालेल्या फायद्यापेक्षा अधिक लाभ हिंदूच्या ध्रुवीकरणामुळे मिळाला असल्याचे दिसते. २०२६च्या निवडणुकीत ‘एसआयआर’मध्ये ८९ लाख मतदार वगळले गेले. ६२ लाख मतदारांच्या छाटणीनंतर आणखी २७ लाख मतदारांचे भवितव्य अधांतरी राहिले. या मतदारांनी गेल्या निवडणुकीत मतदान केले होते. मात्र, ‘तांत्रिक विसंगती’च्या नावाखाली त्यांची नावे वगळली गेली, त्यांना मतदारयादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण तोपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान होऊन आता निकालही लागला.
आयोगाकडून १६ टक्के मतांचा फायदा
एसआयआरमध्ये मुस्लीम मतदारांना वगळण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या पराभव झाल्याचेही गणित मांडले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ टक्के मुस्लीम आहेत पण, ‘एसआयआर’मध्ये वगळलेल्या मतदारांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण ३४ टक्के आहे. राज्यात हिंदू ७२ टक्के आहेत, वगळलेल्या मतदारांमध्ये हिंदू मतदार ६३ टक्के आहेत. म्हणजे तुलनेत मुस्लीम मतदारांना वगळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे भाजपला निवडणुकीआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ टक्के मतांचा फायदा करून दिला असेही गणित मांडता येते. ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदारसंघामध्ये २० टक्के मुस्लिम असताना ४० टक्के मुस्लिम मतदारांना वगळले गेले. यावेळी या मतदारसंघात ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला आहे.
विजयामागे हिंदू धुव्रीकरण
२०२६ मध्ये भाजपने आतापर्यंत कधीच न जिंकलेल्या ६५ जागा पहिल्यांदा जिंकल्या. २०१९ व २०२४ च्या लोकसभा मतदारसंघांमधील विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने जिंकलेल्या त्याच ५४ जागा २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही जिंकल्या होत्या. या वेळी २०२६ मध्ये या ५४ जागा जिंकल्याच शिवाय, पूर्वी एकदा वा दोनदा जिंकलेल्या १४२ जागाही जिंकल्या. त्यामुळे भाजपने अतिरिक्त २०७ जागा जिंकल्या. या जास्त जागा जिंकण्यामागे हिंदू ध्रुवीकरण हे प्रमुख कारण होते.
भाजपच्या मतांमध्ये ७.१ टक्के वाढ
पश्चिम बंगालमध्ये २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४५.८ टक्के तर, तृणमूल काँग्रेसला ४१.१ टक्के मते मिळाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी भाजपच्या मतांमध्ये ७.१ टक्के वाढ झाली. तर तृणमूल काँग्रेसची मते ४.७ टक्क्यांनी कमी झाली. भाजपला ५६ लाख मते जास्त मिळाली तर ‘तृणमूल’ला १७ लाख मते कमी मिळाली. पण, समजा, २७ लाख मतदारांनी मतांची हक्क बजावला असता तर ‘तृणमूल’च्या मतांचा वाटा कमी झाला नसता असे गृहित धरले जात आहे.
‘तृणमूल’ची साथ सोडून भाजपला मतदान
* तृणमूल काँग्रेसने २०११, २०१६ आणि २०२१ या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याच ३९ जागा जिंकल्या. त्यामध्ये ५० टक्के मुस्लीम लोकसंख्या होती. २०२६ मध्ये मात्र त्यापैकी फक्त ३४ जागा ‘तृणमूल’ला जिंकता आल्या. ५ जागा भाजपने जिंकल्या. या मतदारसंघांमध्ये इतर पक्षांमुळे मुस्लीम मतदारांचे विभाजन झाले.
* २०२६ मध्ये ४० मुस्लीम उमेदवार निवडून आले. त्यांच्या मतांचा वाटा वाढून ४२.५ टक्क्यांपर्यंत गेला. म्हणजेच ध्रुवीकरणातही वाढ झाली. २०२१च्या तुलनेत २०२६मध्ये २६८ मतदारसंघांमध्ये ‘तृणमूल’ची मतांची टक्केवारी घसरली. ६९ मतदारसंघांमध्ये ही घसरण १० टक्क्यांपेक्षा जास्त होती. या तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत २७० मतदारसंघांमध्ये वाढ झाली. त्यातील ९५ मतदारसंघांमध्ये मतांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. * भाजपचा हा वाढीव मतटक्का आणि त्याचबरोबर ‘तृणमूल’ची कमी झालेली मतांची टक्केवारी पाहिली तर हिंदू मतदारांनी ‘तृणमूल’ची साथ सोडून भाजपला मतदान केले. एका बाजूला मुस्लीम मतदारांनी मुस्लीम उमेदवारांना अधिक मते दिली तर हिंदू मतदारांनी भाजपला अधिक पसंती दिली.
