पीटीआय, कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २९४पैकी १७७ मतदारसंघांमध्ये मतमोजणीदरम्यान गैरप्रकार करून विजय मिळवला असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला. निवडणुकीनंतर राज्यभरात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्या-नेत्यांवर होणार्या हल्ल्यांच्या निषेधार्ध मंगळवारी मध्य कोलकात्यात पक्षातर्फे दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याला ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.
निवडणुकीनंतरचा हिंसाचार, पुनर्वसनाविना फेरीवाल्यांना हटवणे, नीट परीक्षेतील अनियमितता, घोटाळा आणि भाजप सरकारच्या सूडबुद्धीने कारवाया याविरोधात ही धरणे आंदोलन करत असल्याचे बॅनर्जी यांनी ‘एक्स’वर लिहिले. या कठीण काळात आपण तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही, असे ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तृणमूलच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार, धाकदपटशा आणि खंडणी आणि कार्यकर्त्यांचा छळ असे आरोप ठेवून राज्यात अटकसत्र सुरू आहे. त्यासंदर्भात बॅनर्जी बोलत होत्या.
लवकर विरोधकांकडून देशव्यापी भाजपविरोधी निदर्शनांची आखणी केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ‘इंडिया’ आघाडीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले झाले आहेत. त्यात अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. हे हल्ले भाजपने केल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे.
लवकरच सर्व भाजपविरोधी पक्षांची दिल्लीत बैठक होईल. काही दिवस वाट पाहा, आम्ही काही दिवसांत देशव्यापी निदर्शने जाहीर करू.
- ममता बॅनर्जी, नेत्या, तृणमूल काँग्रेस</strong>
