West Bengal Assembly Election Voting: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देशभरात राजकीय दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ व पुदुच्चेरीमध्ये मतदान पार पडलं. आज २३ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी तर संपूर्ण तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणुकासाठी मतदान पार पडत आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या अनुषंगाने कडक पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेली असतानाही मुर्शिदाबादमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर आजदेखील दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
पश्चिम बंगालमध्ये सकाळी १ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के मतदान झालं आहे. SIR चा मुद्दा यावेळी आसामप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येदेखील चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या यंदाच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रामुख्याने निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे.
मुर्शिदाबादमध्ये दोन घटनांमुळे तणाव वाढला
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये काल मतदानाच्या पूर्वसंध्येला नाओदा परिसरात हातबॉम्ब फोडल्यामुळे रात्रीच्या सुमारास गोंधळ उडाला. या घटनेत एक महिला जखमी झाली. त्यामुळे मतदानाच्या आदल्याच दिवशी सुरक्षा पथके अलर्ट झाली. आपण नमाज अदा करण्यासाठी घराबाहेर पडलो असता हा स्फोट झाला, अशी माहिती जखमी व्यक्तीने दिली. संध्याकाळी ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये जनता उन्नयन पार्टीचे हुमायून कबीर यांचा हात असल्याचादेखील संशय व्यक्त करण्यात आला.
हातबॉम्ब फेकल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी मुर्शिदाबादमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. तृणमूल काँग्रेस व आम जनता उन्नयन पार्टीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यावेळी दगडफेकदेखील झाली. या पार्श्वभूमीवर या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली. काही वेळात पोलिसांनी इथली परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं पाहायला मिळालं.
