पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील तारापीठ भागात आज पहाटे एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ७ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर या भागात मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले असून हॉटेल्समध्ये वास्तव्यास राहात आहेत. याच परिसरातील बिदेशिनी हॉटेलमध्ये आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठीच्या इमर्जन्सी एक्झिटला चक्क कुलूप लावण्यात आलं होतं. त्यामुळे आग पसरली, तेव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे नागरिक आतच अडकून पडल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे.

फायबर इंटेरियरमुळे आग वेगाने पसरली!

काही स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बिदेशिनीच्या चार मजली इमारतीमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास ही आग लागली. हॉटेलच्या रिसेप्शन भागातून आगीला सुरुवात झाली. नंतर हळूहळू ही आग हॉटेलच्या सर्व मजल्यांवर पसरली. मजल्यांच्या छताचं चुकीचं बांधकाम व इंटेरियर डिझायनिंगसाठी फायबर पॅनल्सचा वापर केल्यामुळे आग अधिक वेगाने पसरल्याचा मुद्दा प्रत्यक्षदर्शींनी नमूद केला.

तारापीठ मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक थांबले होते. आग लागल्यानंतर हॉटेलमधून भाविकाच्या ओरडण्याचा आणि मदतीसाठी धावा करण्याचा आवाज येऊ लागला. काहींनी बाल्कनीमध्ये धाव घेतली व तिथून खाली उरण्यासाठी प्रयत्न करू लागले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत या दुर्घटनेत ७ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

“बाल्कनीत गेलो आणि खाली उडी मारली”

या घटनेतून बचावलेल्या काही भाविकांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांचा धक्कादायक अनुभ सांगितला. “आम्ही हॉटेलच्या सगळ्यात खालच्या मजल्यावरच्या खोलीत थांबलो होतो. आम्हाला अचानक बाहेर गोंधळ ऐकू आला. आम्ही खोलीचा दरवाजा उघडताच आगीमुळे निर्माण झालेली प्रचंड उष्णता आम्हाला जाणवली. आम्ही लगेच दरवाजा बंद केला, खोलीतल्या सगळ्या लाईट आणि पंखे बंद केले, बाल्कनीमध्ये धाव घेतली आणि तिथून बाहेर उडी मारली”, असं आगीतून बचावलेल्या एका भाविकानं सांगितलं.

“पहाटे लोकांच्या गदारोळामुळे आम्हाला जाग आली. खोलीच्या बाहेर प्रचंड धूर होता. आम्हाला समोरचं काहीच दिसत नव्हतं. मी व माझ्या पतीने आमच्या मुलांना उठवून सोबत घेतलं आणि आम्ही बाल्कनीत गेलो. माझे पती बाल्कनीतून खाली उतरले आणि त्यानंतर मी मुलांना एकेक करून त्यांच्याकडे दिलं. नंतर मीही बाल्कनीतून खाली उतरले. ते सगळं फार भीतीदायक होतं”, अशी प्रतिक्रिया पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिला भाविकाने दिली.

आग नेमकी कशामुळे लागली?

पोलीस व अग्निशमन दलाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. मात्र, यासंदर्भात सविस्तर तपास केला जात असून फॉरेन्सिक पथकाकडूनदेखील घटनास्थळाची सखोल पाहणी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.