कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारने मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यात कल्याणकारी योजनांबरोबर राजकीय आणि प्रशासकीय फेररचना संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील एक लाख सरकारी नोकऱ्यांसाठी भरती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच आर्थिक शिस्तीवर भर देत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे अर्थमंत्री स्वपन दासगुप्ता यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४.३८ लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडला. यापूर्वी तृणमूल काँग्रेस सरकारने फेब्रुवारीमध्ये ४.०६ लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आपल्या सरकारला ८.१५ लाख कोटींच्या कर्जाचा वारसा मिळाल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प आधुनिक, प्रगतशील आणि विकसित बंगालसाठी कृती आराखडा असल्याचे दासगुप्ता म्हणाले.
दासगुप्ता अर्थसंकल्प मांडत असताना सत्ताधारी बाकांवरून बाके बडवून उत्साहात स्वागत केले जात होते. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता १ ऑक्टोबरपासून २० टक्क्यांनी वाढवून ३८ टक्क्यांपर्यंत नेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राज्य कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा महागाई भत्त्यासाठी आंदोलने केली होती.
प्रमुख तरतुदी
– एक लाख नोकरभरती, त्यात २० हजार पोलिसांच्या तर ५० हजार शालेय शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या
– महिला व बालविकास आणि सामाजिक कल्याण खात्यासाठी सर्वाधिक ५२ हजार ३०८ कोटींची तरतूद, पंचायत आणि ग्रामीण विकास खात्यासाठी ५१ हजार ८३६ कोटी, तर शालेय शिक्षण खात्यासाठी ४४ हजार ९४८ कोटी रुपये मंजूर
– नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के, लागू असेल तिथे ‘अग्निवीर’साठी १० टक्के राखीव जागा
– अल्पसंख्यांक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागाच्या तरतुदीत ६० टक्क्यांपेक्षा जास्त कपात, पूर्वीच्या ५,७१३ कोटींऐवजी २,१६५ कोटी तरतूद
उद्योगांवर आधारित धोरण
पश्चिम बंगालला उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि पूर्व भारतातील गुंतवणुकीचे केंद्र करणार असल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले. त्याचवेळी राज्यात उद्योग-व्यवसाय करणे सोपे व्हावे यासाठी पावले उचलली जातील, असे ते म्हणाले. याअंतर्गत राज्यातील बंदरांचा विकास, प्रमुख पायाभूत सुविधांचा विकास, उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक आणि व्यवसाय सुधारणा, सेमिकंडक्टर प्रकल्प, संरक्षण उत्पादन केंद्रे, बंदर, कोलकात्याजवळ नवे विमानतळ, खंडणी आणि सिंडिकटे पद्धतीविरोधात कायदा अशा अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या.
श्यामाप्रसाद मुखर्जींचा १२५ फुटी पुतळा
जनसंघाचे संस्थापक आणि भाजपचे महत्त्वाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १०० जयंतीदिनी सरकारी सुटीची घोषणा करण्यात आली आहे. मुखर्जी यांच्या स्मरणार्थ १२५ फूट उंच पुतळा बांधण्याबरोबर, ‘वंदे मातरम’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आधुनिक वस्तूसंग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राची उभारणा करण्याचे दासगुप्ता यांनी जाहीर केले.
राज्याला आर्थिक शिस्त लावणे आणि प्रशासनावरील जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणे याला आमचे प्राधान्य असेल. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा आमच्या दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू आहे. – स्वपन दासगुप्ता, अर्थमंत्री, पश्चिम बंगाल
