नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भाजपने सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला गती दिली असून, मंगळवारी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी हे सहनिरीक्षक असतील. भाजपच्या नव्या सरकारचा ९ मे रोजी शपथविधी होणार आहे.
सरकार स्थापनेची प्रक्रियाही विनाअडथळा व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री निवडीपासून मंत्र्यांच्या नियुक्तीपर्यंत सर्व निर्णय अमित शहा घेणार आहेत. त्यासाठी शहा पश्चिम बंगालला रवाना होतील. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. आसाममध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपकडून केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांना केंद्रीय निरीक्षक व हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना सहनिरीक्षक म्हणून पाठवले जात आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अधिकारी
* भाजपचा आक्रमक चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रभागी असून प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य, अग्निमित्रा पोल, रूपा गांगुली आदी नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत.
* एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जाणारे अधिकारी भाजपमध्ये आल्यानंतर शहांचे निष्ठावान बनले. यावेळी निवडणुकीतही त्यांनी हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार केला. शिवाय, अधिकारी यांनी दोनदा ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे.
