पश्चिम बंगाल – भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांना आता ‘झेड’ सुरक्षा, बुलेटप्रुफ कार

नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

संग्रहीत

पश्चिम बंगालमध्ये चार दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ज्यामध्ये नड्डा यांना दुखापत झाली नाही, मात्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अन्य नेते जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर आता कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कैलाश विजयवर्गीय यांना आता झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्या आली असून, त्यांच्याकडे बुलेटप्रुफ गाडी देखील असणार आहे. या अगोदर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये भाजपा व तृणमूल काँग्रेसमध्ये अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरादार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवाय, कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कैलाश विजयवर्गीय यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे दिसत आहे.

नड्डांवरील हल्लाप्रकरणी गृहमंत्रालयाची कारवाई, तीन IPS अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावलं

आगामी वर्षात बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कैलाश विजयवर्गीय हे प्रभारी असल्याने सातत्याने ते विविध ठिकाणी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही भाजपासाठी महत्वाचा आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरादार टीका केली आहे. शिवाय, केंद्रीय गृहमंत्रलयाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना दिल्लीत देखील बोलावून घेण्यात आले आहे.

कशी असते झेड दर्जाची सुरक्षा?
झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत चार ते पाच एनएसजी कमांडोंसह एकूण २२ सुरक्षा रक्षक असतात. यामध्ये दिल्ली पोलीस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे कमांडो व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: West bengal bjp leader kailash vijayvargiya now has z security bulletproof car msr