भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवत मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचा दारूण पराभव केला. आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा लवकरच सरकार स्थापन करणार आहे. पण ममता बॅनर्जी यांचा पराभव होऊन देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापलं आहे. या घडामोडी सुरू असताना आणि भाजपा लवकरच पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करणार असल्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा नेते दिलीप घोष यांनी एक मोठं वक्तव्य करत ममता बॅनर्जी यांना मोठा इशारा दिला आहे.

‘सब का साथ, सब का विकास आणि या बरोबरच सब का हिसाब’, असं सूचक भाष्य दिलीप घोष यांनी केलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेनंतरचं भाजपाचं धोरण काय असेल? हे सूचकपणे घोष यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दिलीप घोष यांचं हे वक्तव्य म्हणजे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा इशारा देखील आहे. घोष यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.

बंगालमधील भाजपा सरकारचा अजेंडा काय असेल? : या प्रश्नावर बोलताना दिलीप घोष यांनी म्हटलं की, “आता बिहारमध्ये देखील परिस्थिती खूप वाईट होती. मात्र, आता आम्ही त्यात सुधारणा करत आहोत. आमचा विश्वास आहे की जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठी क्षमता आहे आणि येथील लोकांमध्ये ती ताकद आहे. त्यामुळे आम्हाला येथील लोकांना एक चांगलं प्रशासन द्यावं लागेल. नोकरीसाठी ५० लाखांहून अधिक तरुणांनी बंगाल सोडलं. त्यांना आता परत आणून बंगालमध्येच काम देणं आमचं कर्तव्य असेल. आम्ही त्यांना ती संधी देऊ. मात्र, टीएमसी सरकारच्या काळात चांगलं प्रशासन नव्हतं, कायदा आणि सुव्यवस्था नव्हती, उद्योगधंदे नव्हते. शिक्षणागाची अवस्था वाईट होती. आरोग्याची अवस्था वाईट होती. अनेक लोक हे राज्य सोडून जात आहेत. पण आता आम्ही बंगालमध्ये चांगलं काम करू”, असं ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील जनादेशाकडे तुम्ही कसं पाहता? : या प्रश्नावर बोलताना दिलीप घोष म्हणाले की, “हा जनतेचा जनादेश आहे. मागच्या वेळी (२०२१) जनतेला भाजपाला सत्तेत आणायचं होतं. पण आम्ही सत्तेपर्यंत पोहोचू शकलो नाहीत. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात बसलो. त्यानंतर टीमसीच्या काळात लोकांनी पाहिलं की देशाच्या तुलनेत बंगाल विरुद्ध दिशेने जात आहे आणि म्हणून यावेळी पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाला एक संधी दिली”, असं घोष यांनी म्हटलं आहे.

टीएमसीच्या कार्यालयांची तोडफोड झाल्याचा आरोप झाला. यावर भाजपाची भूमिका काय? : यावर बोलताना घोष यांनी म्हटलं की, “२०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर किती भाजपा कार्यकर्त्यांची हत्या झाली, हे कोणीही विसरता कामा नये. मागच्या वेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षाचे जवळपास डझनभर कार्यालये ताब्यात घेतले होते. आमच्या कार्यालयांचे रंग बदलण्यात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे झेंडे लावले होते. पण यावेळी घाबरण्याचं काहीही कारण नाही”, असं घोष यांनी म्हटलं आहे.

दिलीप घोष यांचा ममता बॅनर्जी यांना अप्रत्यक्ष इशारा

दुसऱ्या पक्षांच्या प्रति भाजपाचा दृष्टिकोन काय आहे? : या प्रश्नावर बोलताना दिलीप घोष म्हणाले की, “देशभरात अनेक राज्यांमध्ये सध्या भाजपा सत्तेत आहे. जनतेने जनादेशाच्या माध्यमातून मोदींना केंद्रात सत्तेवर आणलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काय आहे? हे सर्वांना माहिती आहे. सर्वांनी निश्चिंत राहावं, आम्ही सर्वांना समान संधी देऊ. सब का साथ, सब का विकास आणि याबरोबरच ‘सब का हिसाब’ म्हणजे कायदा कायद्याचं काम करेल”, असं सूचक भाष्य करत दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, यावर तुमचं मत काय? : यावर बोलताना दिलीप घोष म्हणाले की, “जनतेने त्यांना १५ वर्षे दिली आहेत. मात्र, तरीही ममता बॅनर्जी यांनी जनतेसाठी काहीही काम केलं नाही. त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला आणि केंद्र सरकारवर आरोप केले. एसआयआर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही गेल्या होत्या. पण फक्त तक्रार करून काही होत नाही. काम करून स्वतःला सिद्ध करावं लागत असतं. त्यामुळे आता जनतेने त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली.”

ममता बॅनर्जी यांचा राजकीयदृष्ट्या हा शेवटचा टप्पा असू शकतो का? : या प्रश्नावर बोलताना दिलीप घोष म्हणाले की, “जनता त्यांना हेच सांगत आहे की आता तुम्ही घरी राहा, आराम करा. मात्र, सवयी सहजासहजी सुटत नसतात. त्यामुळे त्या तक्रार करत असाव्यात. मात्र, बंगालच्या लोकांना विकास हवा आहे म्हणून त्यांनी भाजपाला निवडलं.”

तुम्हाला कोणतं खातं मिळेल? : यावर दिलीप घोष म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचार आणि राज्यावरील कब्जा केलेल्या बांगलादेशींची घुसखोरी संपवण्यासाठी जेसीबींची गरज आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली सर्व कर्तव्य मी पार पाडली आहेत. पक्षाने मला निवडणूक लढवायला सांगितलं होतं, मी लढलो आणि जिंकलो. आता पुढे मी काय करायचं हे पक्षच ठरवेल.”