कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार करण्यात आला. लोक भवन येथे झालेल्या सोहळ्यामध्ये राज्यपाल आर. एन. रवी यांनी स्वपन दासगुप्ता, तपस रॉय आणि शंकर घोष यांच्यासह ३५ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. खातेवाटप बुधवारी केले जाईल, अशी माहिती तपस रॉय यांनी दिली.

शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपने भौगोलिक, वांशिक आणि लिंगभेद यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि गृहसेवकासारख्या चतुर्थ श्रेणीत काम करणारे यासारख्या विविध क्षेत्रातील व्यावायिकांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

सोमवारी झालेल्या सोहळ्यात १३ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, तिघांनी राज्यमंत्रीपदाची (स्वतंत्र कारभार) आणि १९ मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या ४१ झाली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेचे संख्याबळ २९४ इतके असून राज्यात मंत्र्यांची कमाल संख्या ४४ असण्यास अनुमती आहे. यापूर्वी ९ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अधिकारी यांच्यासह पाच जणांचा शपथविधी झाला होता.