West Bengal Chief Secretary Manoj Kumar Agarwal: संपूर्ण देशात गाजलेली पश्चिम बंगालची निवडणूक निकालानंतरही विविध नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत बांगलादेश सीमेवर कुंपणासाठी बीएसएफकडे जमीन हस्तांतरित केली. याशिवाय आजच मंत्रिमंडळाचे खातेवाटप देखील जाहीर करण्यात आले. अधिकारी यांनी सोमवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) मनोज कुमार अग्रवाल यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. यामुळे पुन्हा एकदा बंगाल चर्चेत आले आहे.
कोण आहेत मनोज कुमार अग्रवाल?
मुख्य सचिव हे राज्यातील सनदी अधिकाऱ्यांचे सर्वोच्च पद आहे. मनोज कुमार अग्रवाल हे १९९० च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. अग्रवाल यांची दुष्यंत नारियाला यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. नारियाला (१९९३ बॅच) यांची १५ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. नारियाला आता दिल्लीत बंगालचे नवीन निवासी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. दरम्यान, अग्रवाल यांच्या नियुक्तीनंतर तृणमूल काँग्रेसने भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तृणमूल काँग्रेसकडून टीका
तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी अग्रवाल यांच्या नियुक्तीला ‘निर्लज्जपणाची परिसीमा’ म्हटले, तर पक्षाचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपरोधिकपणे नियुक्तीला ‘योगायोग’ असे म्हटले आहे. गोखले यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. या नियुक्तीतून भाजप आणि निवडणूक आयोग ‘निवडणूक चोरी करण्याबाबत उघडपणे जाहीर करत आहेत’ हे दिसून येते आणि न्यायालये ‘आंधळी होती की यात सामील होता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तृणमूलच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी हा प्रकार संतापजनक आणि निर्लज्जपणाचा असल्याची टीका केली.
सुब्रत गुप्ता यांची नियुक्ती
भाजपा सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे अग्रवाल हे निवडणूक प्रक्रियेशी निगडित दुसरे मोठे अधिकारी आहेत. यापूर्वी शनिवारी, राज्य सरकारने निवृत्त आयएएस अधिकारी सुब्रत गुप्ता यांची मुख्यमंत्री अधिकारी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. मे २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या गुप्ता यांची निवडणूक आयोगाने ‘विशेष रोल ऑब्झर्व्हर’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेमुळे सुमारे ६२ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती, तर अन्य २७ लाख मतदारांची नावे ‘अॅडज्युडिकेशन’ प्रक्रियेद्वारे हटवण्यात आली होती.
मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
अग्रवाल यांच्या नियुक्तीसोबतच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेल्या पाच मंत्र्यांच्या खात्यांचे वाटपही निश्चित केले आहे.
१) अग्निमित्रा पॉल: नगरविकास आणि नागरी व्यवहार तसेच महिला व बालविकास आणि समाजकल्याण (अतिरिक्त भार)
२) दिलीप घोष: पंचायत, ग्रामीण विकास आणि पशुसंवर्धन
३) निसिथ प्रामाणिक: उत्तर बंगाल विकास तसेच क्रीडा आणि युवक कल्याण<br>४) अशोक कीर्तनिया: अन्न व नागरी पुरवठा
५) क्षुदिराम तुडू: बहुजन कल्याण
