कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बालविवाहाविरोधात राज्यव्यापी कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन बालविवाह तसेच अल्पवीयन गर्भवतींचा शोध घेतला जाणार आहे. बालविवाहामध्ये सहभागी असणाऱ्यांवर अटक करणे, तुरुंगवास आणि सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ बंद करणे यासारखी कारवाई केली जाईल, असे अधिकारी यांनी जाहीर केले.
अल्पवयीन मुलींशी विवाह करणारे तसेच अशा विवाहांमध्ये मदत करणारे यांच्याविरोधात सरकार बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ आणि ‘पोक्सो’ कायदा लागू करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या पुरुषांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल आणि पत्नीच्या वाचा वैध पुरावा देण्यास सांगितले जाईल. जर त्यांना असा पुरावा देता आला नाही, तर कठोर कारवाई केली जाईल,” असे अधिकारी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.
पश्चिम बंगालच्या आरोग्य सेवा केंद्रे, रुग्णालये, दवाखाने इत्यादी ठिकाणी १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास ६० हजार अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची नोंद राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बालविवाहांविरोधात कठोर कारवाईची घोषणा केली. मुर्शिदाबाद येथे १२ हजार ८४७ तर दक्षिण २४ परगणा येथे अल्पवयीन माता आढळल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बालविवाह आणि अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर असल्याचेही अधिकारी यांनी सांगितले.
