Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची धामधूम सुरू आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी पार पडलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू असून तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेससह सर्वच पक्षाचे नेते निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले आहेत. या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज (२६ एप्रिल) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एका सभेत बोलत असताना अचानक संतापल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे.
नेमकं काय घडलं?
पश्चिम बंगालच्या भवानीपूरमध्ये एक निवडणूक रॅली सुरू होती. मात्र, यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध म्हणून स्वत:ची जाहीर सभा थांबवली आणि त्या व्यासपीठावरून त्यांचं भाषण अर्धवट सोडून निघून गेल्या. या सभेच्या जवळच भाजपाची रॅली सुरू होती आणि त्या रॅलीतील आवाज मोठ्या प्रमाणात येत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाषण करताना व्यत्यय निर्माण होत होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “ते मुद्दाम गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ते माझ्या आजूबाजूला गोंगाट आणि गोंधळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून मी ही रॅली आणि सभा घेऊ शकणार नाही.”
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
“माझ्या आई, बहिणी आणि भावांनो, कृपया मला माफ करा. मी उद्या या परिसरात पुन्हा एक रॅली घेणार आहे. मात्र, असं निर्लज्ज वर्तन मी सहन करू शकत नाही. हे अत्यंत अपमानजनक आणि लज्जास्पद आहे. व्यासपीठावरून जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांची माफी मागते”, असं म्हणत भर सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आणि भाजपाच्या सभेच्या आवाजामुळे स्वत:चं भाषण अर्धवट सोडून निघून गेल्या.
यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या टीएमसीच्या कार्यकर्त्यांवरही संतापल्याचं पाहायला मिळालं. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “हे असं चालू राहू शकत नाही. रॅली काढण्यासाठी आमच्याकडे अधिकृत परवानगी होती. मग ते (भाजपा) असं का करत आहेत? निवडणुकांचे काही नियम आणि कायदे असतात. जर ते असं करू शकतात, तर टीएमसीचे कार्यकर्तेही (भाजपाच्या रॅलींजवळ) लाऊडस्पीकर लावतील. जर पोलीस लाऊडस्पीकर काढायला आले तर महिलांना तक्रार दाखल करायला सांगा”, असंही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:तं भाषण अर्धवट सोडून निघून गेल्यानंतर संतप्त टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करण्यासाठी त्यांच्या सभेच्या दिशेने मोर्चा काढला. यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे काही वेळ मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी परिस्थिती चिघळल्याने सुरक्षा दलांना हस्तक्षेप करवा लागला. त्यानंतर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.
अमित मालवीय यांची टीका
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच या घटनेचा व्हिडीओही त्यांनी एक्सवर शेअर केला आहे. अमित मालवीय यांनी म्हटलं की, “भाजपाच्या लाऊडस्पीकरमधून येणाऱ्या मोठ्या आवाजाचं कारण देत ममता बॅनर्जी मंचावरून निघून गेल्या. जेव्हा नेते आपला संयम गमावतात, तेव्हा ते अनेकदा त्यांच्यातील तीव्र चिंतेचं लक्षण असतं. हे येऊ घातलेल्या पराभवाचं चित्र आहे का?”, अशी टीका अमित मालवीय यांनी केली.

भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी आमने-सामने
दरम्यान, भवानीपूर हा टीएमसीचा बालेकिल्ला मानला जातो. त्या भवानीपूरच्या कालीघाट येथे राहतात आणि त्यांनी ही जागा सलग तीन वेळा जिंकली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी आपले उमेदवार सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. २०२१ मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी पूर्व मेदिनीपूरमधील नंदीग्राम येथे बॅनर्जी यांचा १,९५६ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील पोटनिवडणूक जिंकून त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या होत्या.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, तर भाजपा पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. मतदानापूर्वीच, एसआयआर आणि मतदार याद्यांमधून नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि टीएमसी यांच्यात संघर्ष झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. निवडणूक आयोगावर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप टीएमसी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. आता पश्चिम बंगालमध्ये इतक्या मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे.
‘अंतिम टप्पा भाजपाला सत्तेत आणेल’, मोदींचं पश्चिम बंगालमधील सभेत वक्तव्य
आज (२६ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील बोंगावमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘पहिल्या टप्प्यात टीएमसीचा अहंकार मोडीत काढला, आता अंतिम टप्पा भाजपाला सत्तेत आणेल’, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. याच सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला.
तसेच पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करण्यास सज्ज असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मतदारांच्या सहभागाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, “मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये अतिशय उल्लेखनीय मतदान झालं. त्यामुळे पहिल्या टप्प्याने टीएमसीचा अहंकार मोडीत निघाला.”

‘टीएमसीचा अहंकार मोडीत काढला’
“पश्चिम बंगालने मतदानाच्या पहिल्या टप्प्यात चमत्कार घडवला. पहिल्या टप्प्यात टीएमसीचा अहंकार मोडीत निघाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपाचा दणदणीत विजय निश्चित आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की, १५ वर्षांपूर्वी टीएमसी ‘आई, माती आणि माणूस’ यांचा उल्लेख करून सत्तेवर आली होती. आता त्यांना ‘आई, माती आणि माणूस’ हे शब्दही उच्चारता येत नाहीत. काय कारण असेल? जर टीएमसी नेत्यांनी आम्हाला ‘आई, माती आणि माणूस’ यांची आठवण करून दिली, तर त्यांची पापं उघडकीस येतील. कारण टीएमसीच्या क्रूरतेने आईला रडायला लावलं, अनेक जमिनी घुसखोरांच्या हवाली केल्या आणि बंगालच्या लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
