पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. १० जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत पेगॅसस आणि करोनास्थितीवर चर्चा झाली, असं ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर सांगितलं. पेगॅससची चर्चा संसदेत नाही तर चाय पर होणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “जीडीपीचा अर्थ गॅस-डीझेल-पेट्रोल असा झाला आहे. संपूर्ण देशात आता खेला होबे होणार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध देश असा सामना होणार आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी भेटीनंतर सांगितलं.

“सोनिया गांधी यांनाही विरोधकांची एकजूट व्हावी असं वाटत आहे. काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांवर विश्वास आहे आणि प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर विश्वास आहे. जे लोक सरकारचा विरोध करताहेत त्यांच्याकडे काळा पैसा असल्याचं भासवलं जात आहे.नरेंद्र मोदी २०१९ ला लोकप्रिय होते. त्यांनी करोना मृतांची आकडेवारी ठेवली नाही. अंत्यसंस्कार केले नाहीत आणि मृतदेह गंगा नदीत फेकून दिले. ज्यांनी आपल्या लोकांना गमवलं आहे असं लोक त्यांना माफ करणार नाहीत. “, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर सांगितलं. “माझा फोन पहिलाच टॅप झाला आहे. अभिषेकचाही फोन टॅप होत आहे आणि मी त्याच्याशी रोज फोनवर बोलते. त्यामुळे माझाही फोन टॅप झाला आहे. पेगॅससने सर्वांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं. अच्छे दिन खूप बघितले आता आम्ही सच्चे दिन बघू इच्छित आहोत, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला.


ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न आहे, असंही बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.