कोलकाता : पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती गैरव्यवहारासंबंधात सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मौन सोडले. कोणी काही चुकीचे केल्याचे दिसून आले तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पण, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येईल, असा भाजपचा समज असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

राज्य सरकारच्या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. आपल्याविरोधात विरोधकांनी बदनामीची मोहीम सुरू केल्याचा आरोप करतानाच आपण भ्रष्टाचाराची पाठराखण करीत नाही, असा दावाही त्यांनी केला. आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. तपासातील सत्य कधी बाहेर आले पाहिजे, तसेच त्यावर न्यायालयाने काय निर्णय द्यावा, याबाबत कालमर्यादा निश्चित असली पाहिजे. त्यात कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्याविरुद्ध दुर्हेतूने सुरू असलेल्या मोहिमेचा निषेध करते, असेही त्या म्हणाल्या. शिक्षक भरती घोटाळय़ाचा तपास करताना ज्यांच्या घरातून २२ कोटींची रोख जप्त करण्यात आली, त्या अर्पिता मुखर्जी यांच्यासोबत ममता बातचित करतानाची ध्वनिचित्रफीत भाजपने जारी केली आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना बॅनर्जी म्हणाल्या की, त्या महिलेशी तृणमूल काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. मी तिला ओळखतही नाही. मी अनेक कार्यक्रमांना जाते. तेथे कोणी चित्रण तर त्यामुळे मी दोषी ठरत नाही.

आम्ही कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करीत नाही, किंवा भ्रष्टाचाराला थाराही देत नाही. केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेला तपास हा आमच्या पक्षाला आणि मला अडकवण्यासाठी लावलेला सापळा आहे की काय, हे आम्हाला पाहावे लागेल. -ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री