West Bengal Baruipur minor girl murder : पश्चिम बंगालमधील कोलकत्याजवळ असलेल्या बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह पोत्यात सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणावरून संतप्त झालेल्या स्थानिकांनी बलात्काराच्या आणि हत्येच्या आरोपाखाली एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. ही मुलगी शनिवारी आपल्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू (गिफ्ट) आणण्यासाठी घराबाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुलीच्या कुटुंबियांनी चार जणांनी तिचे बळजबरीने अपहरण केल्याचा आरोप केला. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने हिंसक आंदोलन करत रस्ते अडवले, टायर जाळले आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. प्रेसिडेन्सी रेंजचे पोलीस महानिरीक्षक कंकणप्रसाद बारुई यांनी या घृणास्पद गुन्ह्यात सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमावाने रस्ता खुला केला. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

बारुई यांनी आंदोलकांना सांगितलं की, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना फोन करून सर्व गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून कोणालाही सोडले जाणार नाही, असं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतरच जमावाने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास संमती दिली. शवविच्छेदनानंतरच मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते का, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांच्या नजरकैदेचा दावा

विरोधी पक्षात नव्याने आलेल्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षेवरून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे.

“आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे, जेणेकरून मला तिथे जाता येऊ नये. यावरूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्याचं सिद्ध होतं. परिसरात कलम १४४ लागू नसतानाही माझ्या घरासमोर कशासाठी रूट मार्च केला जात आहे? केंद्रीय दलांसह एवढ्या पोलिसांची गरज येथे का आहे?” असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भाजपा महिलांच्या सुरक्षिततेचे आश्वासन देऊन सत्तेवर आला होता. मात्र, अशा प्रत्येक घटनेमुळे त्यांच्या पोकळ आश्वासनांवर नवे प्रश्न निर्माण होतात.” पीडित मुलीच्या आईशी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी अटक करण्यात आलेले लोक या घटनेत खरोखरच सहभागी होते का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संभाषणादरम्यान, मुलीच्या आईने सांगितले की, त्यांना तीन मुली असून, पोलिसांनी आधी अटक केलेल्या व्यक्तीला सोडून दिले होते.