West Bengal Dengue School Uniform Rules: पश्चिम बंगालचे आरोग्य मंत्री डॉ. शरदवत मुखर्जी यांनी राज्यातील शाळांना विद्यार्थ्यांच्या गणवेशात तात्पुरते बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात सध्या डेंग्यूची साथ पसरली असून पावसाळा आणि त्यानंतरच्या काही महिन्यांसाठी गणवेशातील बदल सुचविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हात आणि पाय झाकले जातील, असे कपडे वापरण्याचे निर्देश सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्री मुखर्जी यांनी नुकतीच राज्यातील आरोग्य विभागाची एक उच्च स्तरीय बैठक घेतली. राज्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
मुखर्जी यांनी सर्व शाळांना आवाहन केले की, पुढील तीन महिन्यांसाठी विद्यार्थ्यांना पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि पूर्ण लांबीची पँट घालण्याची परवानगी द्यावी. तसेच ज्या शाळांतील मुली स्कर्ट घालतात, त्यांना पूर्ण पाय झाकले जाईल असे सलवार सूट घालण्याची परवानगी द्यावी, असाही आग्रह त्यांनी शाळांना केला.
आपल्याला डेंग्यूची साथ पूर्णपणे रोखायची आहे. यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुखर्जी यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिकांना शालेय गणवेशात तात्पुरते बदल करण्याचे आवाहन केले. “कृपया मुलींना स्कर्ट घालून शाळेत पाठवू नका. त्यांचे पाय झाकले जातील, असे सलवार सूट घालू द्या”, असे आवाहन मुखर्जी यांनी केले.
मोजे घालण्याची विनंती फेटाळली
काही शिक्षकांनी गुडघ्यापर्यंत मोजे वापरण्याची सूचना केली होती. मात्र मंत्री महोदयांनी सदर सूचना फेटाळून लावली. ते म्हणाले, “मोजे वापरण्याची सूचना काहींनी केली. गुडघ्यापर्यंत मोजे घातले तरी डासांपासून संरक्षण मिळणार नाही. मोजे त्वचेला चिकटतात आणि ते अतिशय पातळ असतात. त्यामुळे डास त्यातूनही चावू शकतात.” त्याऐवजी शाळांनी मुलींना सलवार सूट आणि मुलांना पूर्ण लांबीची पँट आणि पूर्ण बाह्यांचा शर्ट घालण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले.
गणवेशच्या मार्गदर्शक सूचना देणारे शासकीय परिपत्रक सरकारी शाळांना लवकरच दिले जाईल, असे सांगितले जात आहे. खासगी शैक्षणिक संस्थांनाही अशाच प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना अवलंबण्याची विनंती केली जाईल. असे असले तरी गणवेशातील बदलांबाबतचा अंतिम निर्णय प्रत्येक शाळेच्या प्रशासनाकडेच राहील, असेही सांगितले जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये डेंग्यूची साथ
पश्चिम बंगालमध्ये पावसाळा आणि त्यानंतर डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. आरोग्य अधिकारीही प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना अनेक तास घराबाहेर राबावे लागते. अशावेळी त्यांना डास चावण्याचा धोका वाढतो. म्हणून त्यांच्या गणवेशात बदल प्रस्तावित केले आहेत.
आरोग्य मंत्री मुखर्जी शाळांना आवाहन करताना म्हणाले, मी सर्व शिक्षकांना आणि शाळांना आवाहन करतो की, त्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांसाठी डेंग्यूच्या रुग्णाची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा.
