West Bengal Durga Puja Biryani Poster Controversy: पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेची तयारी सुरू असतानाच उत्तर बंगालमधील सिलीगुडी शहरात शेकडो पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समधून केवळ हिंदू दुकानदारांकडून नागरिकांनी बिर्याणी घेण्यास आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पोस्टर्समुळे सणासुदीच्या काळात बंगाली नागरिकांच्या मांसाहाराच्या परंपरेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या पोस्टर्सची जबाबदारी स्वीकारणाऱ्या हिंदू जागरण मंचच्या नेत्यांनी आपण कोणत्याही समुदायाच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, दुर्गापूजेच्या काळात हिंदू व्यापाऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळावा, हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, विरोधकांनी या पोस्टर्सवरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं. धर्मनिरपेक्ष देशात अशा प्रकारच्या आवाहनांना परवानगी देता कामा नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

‘बिर्याणी खाण्यास विरोध नाही, पण हिंदूंच्या दुकानातून खा’

पोस्टर्सवरील काही संदेशांमध्ये, ‘तुम्हाला बिर्याणी खाण्यापासून कोणी रोखत नाही; मात्र ती हिंदूंच्या दुकानातील खा’, ‘मांस हिंदूंच्या दुकानातून खरेदी करा’ आणि ‘क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देण्यापूर्वी दुकानदाराचे नाव विचारा’, असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय, ‘सर्व जातींमधील हिंदूंनी एकत्र यावं’ आणि ‘व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करावी’, असे संदेशही पोस्टर्सवर देण्यात आले आहेत.

हिंदू जागरण मंचचे नेते प्रशांत सरकार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या मोहिमेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “दुर्गापूजेच्या काळात आम्ही मांसाहार करणारच आहोत, कारण ती आमची परंपरा आहे. मात्र, लोकांनी हिंदूंच्या दुकानांतून बिर्याणी खरेदी करावी, असं आमचं आवाहन आहे. फुलांसारखे पूजेचे साहित्यही हिंदूंच्या दुकानांतून खरेदी करण्याची विनंती आम्ही केली आहे. आम्ही कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाही. मात्र, दुर्गापूजेचा आर्थिक लाभ हिंदू व्यापाऱ्यांनाही मिळायला हवा, असं आम्हाला वाटतं.”

दक्षिण बंगालमधील सोनारपूर येथील मंचचे नेते निलांजन पांडा यांनीही या भूमिकेचं समर्थन केलं. ते म्हणाले, “दुर्गापूजेभोवती मोठी अर्थव्यवस्था उभी आहे. हिंदूंना त्यांच्या सणाचा आर्थिक लाभ का मिळू नये? आम्ही दक्षिण बंगालमधील काही पूजा समित्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. पूजा मंडपांच्या आसपास केवळ हिंदू दुकानदार आणि स्टॉलधारकांनाच जागा देण्यात यावी, अशी विनंतीही केली आहे.” भाजपावर टीका

या मोहिमेवर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) पश्चिम बंगालचे राज्य सचिव आणि माजी खासदार मोहम्मद सलीम यांनी या प्रकाराला समाजात फूट पाडण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याचं म्हटलं. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सलीम म्हणाले, “एखाद्या समुदायाला समाजापासून दूर ढकलणं आणि विभाजन निर्माण करणं, हा एका सुनियोजित प्रयत्नाचा भाग आहे. यामागे आर्थिक बहिष्कार घडवून आणण्याचा उद्देश आहे. काही वर्षांपूर्वी जयपूर महानगरपालिकेत प्रामुख्याने मुस्लिम चालक असलेल्या बैलगाड्यांवर बंदी घालण्यात आली होती. तसेच, मुर्शिदाबादमधील लालबाग येथे टांगे बंद करण्याचे निर्देश भाजपाने दिल्याचेही मी ऐकले आहे.”

दुर्गापूजेतील शाकाहार-मांसाहाराचा वाद पुन्हा ऐरणीवर

पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच दुर्गापूजेच्या काळात नागरिकांच्या खाद्यसंस्कृतीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ऑगस्टमध्ये भाजपाची वैचारिक सहकारी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) दुर्गापूजेसाठी काही ‘मार्गदर्शक सूचना’ जारी केल्या होत्या. या सूचनांमध्ये, ‘पूजा मंडपात मांसाहार नेऊ नये आणि मंडपाबाहेरही मांसाहारी पदार्थांची विक्री करू नये’, असं आवाहन करण्यात आलं होतं. या सूचनांवरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर व्हीएचपीने स्पष्टीकरण दिलं. मांसाहारावर कोणतीही ‘बंदी’ घालण्यात आलेली नाही आणि व्हीएचपी फतवे जारी करत नाही, असं संघटनेने स्पष्ट केलं.