West Bengal Election: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. पण, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिले. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मगराहत पश्चिममधील ११ आणि डायमंड हार्बरमधील चार मतदान केंद्रांवर शनिवारी (०२ मे) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. ईव्हीएम मशीन छेडछाड आणि गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने फेरमतदानाचे आदेश दिलेत.

मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे आरोप

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील फाल्टा येथे ईव्हीएमच्या बटणांना टेप लावून छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर भाजपाने केलेल्या आरोपानंतर फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आलेत. फेरमतदानाचे आदेश देण्यात आलेल्या या मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये फेरफार, बूथ जॅमिंग आणि गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. याबाबत मतदार आणि राजकीय पक्षांनी देखील तक्रारी दाखल केल्या होत्या.

आणखी ३० मतदान केंद्रांवर फेरमतदान?

डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील फाल्टा येथे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे फाल्टा विधानसभा मतदारसंघात आणखी ३० मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेतले जाऊ शकते, अशी अंदाज सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग लवकरच स्पष्ट करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९१.६६ टक्के आणि पहिल्या टप्प्यात विक्रमी ९३.१९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे दोन्ही टप्प्यांचे मिळून ९२.४७ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

फाल्टा येथे गैरप्रकाराचे आरोप

काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम ५८(२) अंतर्गत हे मतदान अवैध घोषित केले आहे. या तरतुदीनुसार, आयोगाला मतदान रद्द करून फेरमतदानाचे आदेश देण्याचा अधिकार आहे. फाल्टामध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे सहकारी जहांगीर खान उमेदवार आहेत. पण, ईव्हीएमवर भाजपा आणि सीपीएम उमेदवारांच्या नावांवर टेप लावल्याचा व्हिडीओ समोर आले होते. यानंतर आरोपात तथ्य आढळल्यास फेरमतदान घेतले जाईल असे बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी स्पष्ट केले होते.