मतदान होण्यापूर्वी, मतदान सुरु असताना विविध कारणांनी चर्चेत असणारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आता मतदानाच्या नंतर देखील वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी संबंधित पक्षांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. टीएमसी नेत्यांनी नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेरील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. टीएमसी नेते शशी पांजा आणि कुणाल घोष स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आंदोलनला बसले आहेत.
टीएमसीचे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आंदोलन
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या ०४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता पश्चिम बंगालमध्ये मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न केल्या आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे. टीएमसी नेते आंदोलन करत असताना भाजप कार्यकर्तेही स्ट्रॉंग रूमबाहेर दाखल झाले. भाजप नेते तापस रॉय यांनी, “टीएमसी केवळ अफवा पसरवत आहेत, ते पराभवाची तयारी करत आहेत,” अशा शब्दात टीका केली.
तृणमूलचा आरोप
तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. “निवडणूक आयोगाच्या लाईव्हस्ट्रीमिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक आत काम करत आहेत. आमचा एकही प्रतिनिधी आत नाही. ते आम्हाला आत जाऊ देत नाहीत. ते आम्हाला इतर उमेदवारांशी बोलायला सांगत आहेत. आम्ही इतर उमेदवारांची जबाबदारी का घ्यावी?”, असा सवाल घोष यांनी उपस्थित केला.
तृणमूलची एक्स पोस्ट
दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. तृणमूलने याबाबत एक्सवर पोस्ट करुन नाराजी व्यक्त केली. “भाजपा आणि निवडणूक आयोग मिळून, संबंधित पक्षाच्या सदस्याच्या अनुपस्थित मतपेट्या उघडल्या जात आहेत. हा उघड उघड धोका आहे. पण बंगाल म्हणजे महाराष्ट्र, दिल्ली किंवा बिहार नाही. आम्ही गप्प बसून लोकशाहीची लूटमार होताना पाहणार नाही”, अशी पोस्ट तृणमूल काँग्रेसने केली आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
टीएमसी नेत्यांच्या धरणे आंदोलनानंतर, निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे. “कुगुडीराम अनुशीलन केंद्रामध्ये सात वातानुकूलित स्ट्रॉंग रूम आहेत. मतदान संपल्यानंतर, उमेदवार/निवडणूक प्रतिनिधी आणि सामान्य निरीक्षकांच्या उपस्थितीत या सर्व स्ट्रॉंग रूम पूर्णपणे बंद करून सील करण्यात आल्या. शेवटची स्ट्रॉंग रूम पहाटे अंदाजे ५:१५ वाजता बंद करण्यात आली. ईव्हीएम असलेल्या सर्व स्ट्रॉंग रूम सील करण्यात आल्या आहेत,” असे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
