West Bengal Election Counting Updates : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतमोजणी सुरू होण्याआधीच मध्यरात्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका पोस्टमुळे लक्ष वेधलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन केलं होतं.
भाजपच्या इशाऱ्यावर अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक ‘लोडशेडिंग’ (वीज कपात) करून गैरप्रकार केले जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले आहे की, “हुगळीतील श्रीरामपूर, नदियामधील कृष्णनगर, वर्धमानमधील औसग्राम आणि कोलकाता येथील क्षुदिराम अनुशीलन केंद्रातून मला गंभीर अहवाल प्राप्त होत आहेत. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वीज कापली जात आहे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जात आहेत आणि स्ट्राँग रूमच्या परिसरात संशयास्पद वाहनांची ये-जा सुरू आहे.”
भाजपवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून लोकांचा कौल बदलण्यासाठी केले जात आहे. ज्याप्रमाणे मी रात्रभर जागी राहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही रात्रभर जागून स्ट्राँग रूमबाहेर पहारा द्या. लोकांच्या मतांचे रक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे.”
संशयास्पद स्थिती आढळल्यास काय करावे?
जर कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्या, तर तात्काळ त्या परिसराला घेराव घाला. संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने लेखी तक्रार नोंदवा. तांत्रिक बिघाड किंवा वीज कपातीचे कारण पुढे केल्यास तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची मागणी करा. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता ‘सतर्क आणि सक्रिय’ राहावे, असे आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे. या विधानामुळे बंगालमधील राजकीय वातावरण मतमोजणीपूर्वी अधिकच तापले.
मतमोजणी केंद्रांवर गोंधळ
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतमोजणी केंद्रांवर तृणमूल आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष झाला. मतमोजणी केंद्रावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पेन आणि कागद घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आल्याचा दावा तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय.
तसंच, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या शशी पांजा यांनी मतमोजणी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला असून, मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रतिनिधींनी वापरलेली कागदपत्रे फेकून दिली जात असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील (on-ground) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी विचारले की मतमोजणी प्रतिनिधींना त्यांचे काम नीट करण्यापासून रोखले जात आहे का?
