West Bengal Phase 2 Repolling Order: पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. विविध विषयांमुळे चर्चेत आलेली बंगालच्या विधानसभेची निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये या ना त्या कारणाने वाद होत आहेत. निवडणूक निरीक्षक अजय पाल शर्मा याच्या नियुक्तीनंतर तृणमूलचे उमेदवार जहांगीर बॅनर्जी यांचे समर्थक आणि शर्मा यांच्यात वाद झाला. यानंतर आता अभिषेक बॅनर्जी नेतृत्व करत असलेला डायमंड हार्बर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.
ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड केल्याचा आरोप
डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील फालटा येथे ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा उमेदवार देबांग्शू पांडा यांना याबाबत तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. तृणमूलचे काँग्रेस मतदारांना भाजपाला मत देण्यास मज्जाव करत आहे, असा आरोप पांडा यांनी केला आहे. तसेच, भाजपा उमेदवाराच्या नावासमोर टेप लावून नाव झाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर काही ठिकाणी मतदान काही काळासाठी थांबविण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने देखील या आरोपांची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत.
उमेदवारांचे नाव पट्टी लावून झाकल्याचा व्हिडीओ समोर
भाजपाचे आयटी सेल प्रमुख आणि बंगालचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी देखील याप्रकरणी भाष्य केले आहे. ईव्हीएमबरोबर मतदान केंद्र क्रमांक १४४, १७० आणि १८९ येथे छेडछाड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंबधित समोर आलेल्या काही व्हिडीओनुसार, ईव्हीएमवर भाजपा आणि सीपीएम उमेदवारांचे नाव पट्टी लावून झाकल्याचे दिसत आहे. भाजपा उमेदवार पांडा यांनी याप्रकरणी काही मतदान केंद्रांवर असा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप केला आहे. मतदारांना मतदान करता येऊ नये यासाठी असे करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपा – तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोप
अमित मालवीय यांनी या घटनेवरुन एक्सवर तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. तृणमूलचे उमेदवार जहांगीर खान यांचा उल्लेख त्यांनी गुन्हेगार असा केला. मतदारांची दिशाभूल आणि त्यांच्या मनात गैरसमज निर्माण करण्यासाठी असे करण्यात आल्याचा आरोपही मालवीय यांनी केला. दरम्यान, आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा आणि जहांगीर खान यांच्या वाद झाल्यानंतर या भागात अगोदर तणापूर्ण शांतता आहे. अशात समोर आलेल्या या प्रकारामुळे आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
