पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचा आज (४ मे) निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, अखेर पश्चिम बंगालच्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यश कसं मिळालं? निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरले? यावर विनोद तावडे यांनी भाष्य केलं आहे. तसेच “आता पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीगिरी’ चालणार नाही”‘, असं म्हणत विनोद तावडे यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. ते एएनआयशी बोलत होते.

विनोद तावडे काय म्हणाले?

“आजच्या निवडणुकीच्या या निकालात पश्चिम बंगालमधील निकाल खऱ्या देशभक्त व्यक्तीला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला खूपच महत्वाचा आहे. एकेकाळी आमची एक घोषणा होती की, ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है’. पण आता हीच घोषणा भाजपाचा कार्यकर्ता म्हणेल की, ‘जहाँ हुए पैदा मुखर्जी, वो बंगाल हमारा है’. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं खरं काही कारण असेल तर ते शेवटच्या ७२ तासांत ज्या दंगली घडवून विशिष्ट मतदारांना बाहेर मतदानासाठी पडू न देणं असा प्रकार होत असायचा. तो यावेळी थांबवण्यात केंद्र सरकारला यश आलं”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“यावेळी फ्री अँड फेअर इलेक्शन झालं आणि एकही मृत्यू न होता मतदान पार पडलं. पश्चिम बंगालमधील हे गेल्या अनेक वर्षांतील यावर्षीचं पहिलं असं मतदान आहे. त्यामुळे आज आपण पाहत आहोत की तुष्टीकरणाची राजनिती आता चालणार नाही. आता फक्त विकासाची राजनिती चालेल हे बंगालमध्ये सिद्ध झालं”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“आसामध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येत आहे. तामिळनाडूमध्ये देखील भाजपाच्या जागा वाढल्या आहेत. पण तिथे स्वभाविकपणे नवीन पक्ष निवडणुकीत आल्याने मतदार विभागला गेला. मला वाटतं की पुद्दुचेरीमध्ये भाजपाचं सरकार येत आहे. तसेच केरळमध्येही आम्ही खातं उघडत आहोत, मतांची टक्केवारी आमची वाढत आहे. पण आमचा खरा विजय हा पश्चिम बंगालमध्ये झाला, याचा आम्हाला आनंद आहे”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“पश्चिम बंगाल हे केवळ एक राज्य नाही, तर एक सीमावर्ती प्रदेश आहे. त्या सीमावर्ती प्रदेशातून थेट मुंबईपर्यंत बांगलादेशी घुसखोर येतात आणि या ठिकाणी उद्योग-व्यवसाय बसवतात. त्यानंतर हेच लोक स्थानिक नागरिकांना मागे टाकतात. त्यामुळे मला वाटतं की देशाचे अनेक प्रश्न पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयामुळे सुटणार आहेत”, असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणं याचा आनंद आहे. मात्र, बिहारमध्ये आधी एनडीएचाच मुख्यमंत्री होता. पण पश्चिम बंगालमध्ये जेव्हा राष्ट्रीय ताकदीची व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसते, तेव्हा आंतरराष्ट्रीय सीमांचा विचार केला जातो, तेव्हा विशेषतः बांगलादेशातून जी घुसखोरी होते, पण आता देशाच्या सुरक्षेपासून ते बाकी सर्व मुद्दे आटोक्यात येतील”, असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.