कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिलेल्या कलिंग (ओडिशा), अंगनंतर (बिहार) बंग (बंगाल) जिंकण्यात भाजपला अखेर यश आले आहे. पूर्व भारतातील सर्वात महत्त्वाचे मानले जाणार्‍या पश्चिम बंगालमध्ये प्रथमच विजय मिळवता भाजपने २९४ जागांपैकी २००पेक्षा जास्त जागा जिंकल्या. तर गेल्या १५ वर्षांपासून बंगालवर वर्चस्व राखणार्‍या तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचा दारूण पराभव झाला.

सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर मिळालेली आघाडी भाजपने कायम ठेवली. मतमोजणी संथ गतीने होत असून पुढील फेर्‍यांमध्ये आपला विजय होईल अशी आशा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही व्यक्त केली. पण तसे घडले नाही. भाजपचा हा विजय राज्यात केवळ सत्ताबदल घडवणारा नसून राज्याचा संपूर्ण राजकीय पट बदलणारा असल्याचे मानले जात आहे. राज्याने अवघ्या १५ वर्षांच्या कालावधीत डावीकडून उजवीकडे प्रवास केल्याचे दिसत आहे.

भाजप आणि तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये पाच टक्क्यांचा फरक आहे. भाजपने ४५.५ तर तृणमूल काँग्रेसने ४०.६ टक्के मते मिळवली. काँग्रेस (३.२ टक्के) आणि माकपच्या (४.३ टक्के) मतांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिले. त्याचवेळी २०२१च्या निवडणुकीत एकही जागा न जिंकण्याची नामुष्की ओढवलेल्या काँग्रेसने दोन तर डाव्या पक्षांनी एक जागा जिंकली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाची नेत्रदीपक कामगिरी

२०२४च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेसने २९ तर भाजपने १२ जागा जिंकल्या होत्या. या ४२ लोकसभा मतदारसंघांच्या १९२ विधानसभा मतदारसंघांमध्ये तृणमूलने आघाडी घेतली होती. तर भाजप ९० जागांवर आघाडीवर होता.

संदेशखलीच्या रेखा पत्रा विजयी

राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्द्याशी जोडल्या गेलेल्या संदेशखली येथील भाजपच्या आंदोलनाचा चेहरा असलेल्या उमेदवार रेखा पत्रा यांचा हिंगलगज मतदारसंघातून विजय झाला. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या आनंद सरकार यांचा ५,४२१ मतांनी पराभव केला. गृहिणी असलेल्या रेखा पत्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या शाहजान शेख या स्थानिक नेत्याच्या लैंगिक शोषणाविरोधात लढा दिला होता.

सुवेंदूंचा करिश्मा

पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात आणि तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात सिंगूर आणि नंदीग्रामच्या जमीन हस्तांतरणविरोधी आंदोलनांनी प्रमुख भूमिका बजावली. नंदीग्राम येथे आंदोलनाचे नेतृत्व केलेले आणि एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू साथीदार मानल्या जाणार्‍या सुवेंदू अधिकारी यांनीच त्यांच्या सर्वात मोठ्या पराभवाला हातभार लावला.

स्वाभाविकच त्यांच्याकडे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. एकेकाळी ममता बॅनर्जींचे कट्टर समर्थक असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी २०२१मध्ये त्यांनाच आपल्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते, बॅनर्जी यांनी ते स्वीकारले आणि नंदीग्राममधून त्यांनी अधिकारींविरोधात उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. याही निवडणुकीत अधिकारींनी भवानीपूर येथून निवडणूक लढवताना ममता बॅनर्जींना जेरीस आणले आहे.

सचिवांना फायली सांभाळण्याचे निर्देश

निकाल हाती येत असताना राज्य सरकारने सर्व विभागांचे सचिव आणि कार्यालय प्रमुखांना सरकारी फायली आणि कागदपत्रांचे काटेकोरपणे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांनी जारी केलेल्या आदेशात, योग्य परवानगी घेतल्याशिवाय महत्त्वाचे कागदपत्र किंवा फाइल कार्यालयांबाहेर न नेण्याचे तसेच सरकारी नोंदींची अनधिकृतपणे नकल करण्यास किंवा स्कॅनिंग करण्यास मनाई केली आहे.

निवडणूक आयोगावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी

पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या. तृणमूल काँग्रेसच्या पराभवाला ममता यांनी कथित गैरप्रकारांना जबाबदार धरले. निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करत हा ‘भाजप आयोग’ असल्याचे संबोधले. मतमोजणीपूर्वी मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचाही आरोप त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. आयोगाच्या पाठिंब्याने भाजपने आसाम व पश्चिम बंगालमधील निवडणुका चोरल्या आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतही हाच डाव भाजपने खेळला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

झालमुडीचा आस्वाद

प. बंगालमधील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडी या स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे हा खाद्यपदार्थ लोकप्रिय झाला. विजय साजरा करण्याकरिता भाजपच्या कार्यालयात झालमुडी विक्रेत्याला पाचारण करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.

ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या कुशासनातून जनतेची सुटका करत भाजपने प. बंगालमध्ये केवळ परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन घडवून आणले आहे. आता देशाच्या ७८ टक्के भूभागावर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे शासन असेल. प. बंगाल हे राज्य आसामप्रमाणे विकासाचे इंजिन बनेल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

जनतेने विभाजनवादी शक्तींचा आणि त्यांच्या हिंदूविरोधी अजेंड्याचा पराभव केला. हे निकाल ऐतिहासिक आहेत. या पराभवानंतर विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी पत्त्यांसारखी कोसळेल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार आहेत. – नितीन नवीन, अध्यक्ष, भाजप.

पश्चिम बंगालमधील निकाल खर्‍या देशभक्त व्यक्तीला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. एकेकाळी आमची एक घोषणा होती की, ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है.’ पण, आता हीच घोषणा ‘भाजपचा कार्यकर्ता म्हणेल की, जहाँ हुए पैदा मुखर्जी, वो बंगाल हमारा है.’ – विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप.

केरळमधील नागरिकांनी दिलेल्या उदंड पाठिंब्याबद्दल आभार. आमच्यावर टाकलेला हा विश्वास, उज्वल भविष्यासाठी काम करताना मार्गदर्शक ठरेल. मला आशा आहे की, पुढील पाच वर्षांच्या काळात आमची तुमच्याबद्दलची कृतज्ञता प्रत्येक कृतीतून दिसून येईल. आम्ही दिलेली आश्वासने प्रामाणिकपणाने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. – प्रियंका गांधी, सरचिटणीस, कॉग्रेस.

निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दहा हजार कार्यकर्ते बंगालमध्ये गेले होते. स्थानिक कार्यकर्त्यांंनीही परिश्रम घेत विजय खेचून आणला. – रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष.