Jhalmuri Effect in West Bengal Election Results 2026 : “मी झालमुरी खाल्ली, पण त्याचा ‘झाल’ (तिखटपणा) थेट तृणमूलला लागला,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील एका सभेत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता. झाडग्राममध्ये पंतप्रधानांनी थांबून बंगालचा हा आवडता पदार्थ खाल्ला, तेव्हा तृणमूल काँग्रेसने त्यांची थट्टा केली होती. पण आता त्या साध्याशा ‘झालमुरी’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भाजप झाडग्राम जिल्ह्यातील चारही विधानसभा जागांवर विजयाकडे वाटचाल करत आहे. तसेच, भाजपने आपले ‘अंतिम शिखर’ मानलेल्या बंगालमध्ये प्रथमच सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
बंगालच्या झाडग्राम जिल्ह्यातील नयाग्राम, गोपीबल्लवपूर, झाडग्राम आणि बिनपूर या चारही जागांवर भाजपा आघाडीवर आहे. झाडग्राम हा भाग बंगालच्या ‘जंगलमहाल’ प्रदेशात येतो, हा भाग राज्याचा सर्वात कमी विकसित भाग मानला जातो. येथे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींची (ST) लोकसंख्या सुमारे ४९% आहे, यामुळे हा एक निर्णायक मतदारसंघ ठरला आहे. या मतदारांनी यावेळी भाजपाला भक्कम पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.
झालमुरी म्हणजे काय?
बंगालबाहेरील लोकांसाठी झालमुरी म्हणजे काय, असा प्रश्न पडू शकतो. झालमुरी हा बंगालचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, ज्यामध्ये कुरमुरे, शेंगदाणे, बटाट्याचे तुकडे, कांदा आणि मसाल्यांचे तिखट मिश्रण असते. एप्रिलमध्ये झाडग्राममधील प्रचार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अचानक ताफा थांबवून या पदार्थाचा आस्वाद घेतला आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी कुरमुरे विक्रेत्याला १० रुपयेही दिले. तृणमूल काँग्रेसने या घटनेला लगेच “नाटक” म्हटले होते.
अन् मोदींनी घेतला झालमुरीचा आस्वाद
“पंतप्रधान अचानक थांबले असताना तिथे कॅमेरा कसा काय हजर होता? हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता”, अशी टीका तृणमूलने केली होती. मात्र, आता असे दिसते आहे की पंतप्रधानांच्या त्या झालमुरीच्या विरामाने झाडग्राममध्ये तृणमूलला मोठा फटका दिला आहे. बंगालमधील ‘झालमुरी इफेक्ट’बंगालचा हा अस्सल पदार्थ खाण्यामागे लोकांच्या भावनांशी जोडले जाण्याचा उद्देश होता. सामान्य जनता जो तिखट पदार्थ रोज खाते, तोच देशाचे पंतप्रधान खात आहेत, ही कृती ‘आम आदमी’शी जवळीक साधणारी ठरली. तसेच, तृणमूलच्या “बाहेरचा विरुद्ध भूमीपुत्र” या प्रचाराला उत्तर देण्याची ही एक खेळी होती. हा ‘झालमुरी इफेक्ट’ भाजपसाठी जादूई ठरल्याचे दिसते.
अखेर झालमुरी हे केवळ अन्न नसून बंगालच्या प्रादेशिक अस्मितेशी जोडलेला एक भाग आहे. पंतप्रधान मोदींना याची पूर्ण जाणीव होती, म्हणूनच त्यांनी गेल्या आठवड्यात आपल्या शेवटच्या सभेत म्हटले होते की, ४ मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यावर झालमुरी वाटली जाईल.”४ मे रोजी बंगालमध्ये भाजपाच्या विजयाचा जल्लोष होईल, मिठाई वाटली जाईल आणि सोबतच झालमुरीही दिली जाईल”, असं मोदी म्हणाले होते.
