नवी दिल्ली/ कोलकाता : विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. निवडणूक निकाल हे जनमताचे प्रत्यंतर नसून, ते निवडणूक आयोगाने भाजपच्या साथीने रचलेले षड्यंत्र असल्याचा आरोप ममतांनी केला. हा संघर्ष रस्त्यावर नेणार असून, विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी बळकट करण्याचा निर्धार त्यांनी कोलकाता येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनीही ममतांच्या आरोपांना पाठिंबा दिल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०७ जागा जिंकून सत्तास्थापनेची तयारी भाजपने सुरू केली आहे. निवडणूक आयोगानेही निवडणूक निकालाची अधिसूचना राज्यपालांकडे पाठवली आहे. असे असताना, कोलकात्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याचा पवित्रा घेतला. ‘तृणमूल काँग्रेसने केवळ भाजपविरोधात नव्हे तर, निवडणूक आयोगाविरोधात निवडणूक लढवली. आयोगाने भाजपसाठी काम केले. लोकमताद्वारे पराभूत झाले नसल्याने राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. मी पराभूत झालेले नाही, त्यामुळे लोकभवन येथे (राजीनामा देण्यासाठी) जाण्याचा प्रश्नच नाही,’ असे ममता म्हणाल्या. 

मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली, तृणमूलच्या १०० जागा हडप करण्यात आल्या, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी मतमोजणी संथगतीने करण्यात आली, असे आरोप ममतांनी केले. निवडणूक आयुक्तांचा उल्लेख त्यांनी खलनायक असा केला.

निकालानंतर बदलत्या रणनीतीचे संकेत ममता बॅनर्जी यांनी देत राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची आघाडी भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. त्याच बरोबर ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी ममता यांच्या आरोपांना पाठिंबा दिला आहे.

‘आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी करण्यात आली आहे. ही बाब भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे. त्यामुळे क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. हा मुद्दा कोणत्याही एका पक्षाचा किंवा दुसर्‍याचा नाही,’ अशी टीका

राहुल गांधींनी केली. ‘भाजपने पश्चिम बंगालमध्ये जे केले तेच दिल्लीत आमच्याविरोधात केले. सध्या लोकशाही धोक्यात आहे. ते जर पंजाबमध्ये सत्तेत आले तर पंजाबची लूट करतील,’ असे केजरीवाल म्हणाले. मेहबुबा मुफ्ती यांनी ‘निवडणूक आयोगाने निवडणुकीत घोळ करण्यात प्रावीण्य मिळवले आहे,’ अशी टीका केली.

राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जी यांची भूमिका भारतीय राजकारणातील अपवादात्मक घटना मानली जात आहे. कायद्यानुसार ममता यांना असे करणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, बॅनर्जी या ठाम राहिल्यास राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपने ममता यांच्या या भूमिकेवर टीका करताना ‘भारतीय लोकशाही परंपरेच्या विरोधातला हा निर्णय अराजक निर्माण करेल,’ असे म्हटले आहे. तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रियेलाही उत्तर दिले आहे. काँग्रेस जेथे पराभूत होते तेथे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. जिथे विजय होतो तेथे स्वीकारला जातो हे दुटप्पी धोरण असल्याची टीका भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केली. 

हिंसाचारात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू

कोलकाता : निवडणूक निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारात भाजप व तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता ठार झाला. न्यू टाऊन परिसरात विजयी मिरवणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत मधू मोंडल हा भाजप कार्यकर्ता ठार झाला. तर बिरभूममध्ये तृणमूल काँग्रेसच्या अबिर शेख या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा भाजपवर आरोप आहे.  तृणमूलच्या कार्यालयांमध्ये तोडफोड केल्याचा आरोप पक्षाने केला. कोलकात्यातील टॉलीगंज आणि कसबा तसेच बैरूपूर, कामरहाती, बारनगर उपनगरांत या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’

* पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना राजीनामा द्यावाच लागेल अन्यथा राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

* विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ सात मे रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर ममता यांचा कार्यकाळही आपोआप संपेल, असे ज्येष्ठ वकील अजित सिन्हा यांनी म्हटले.

* नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर बॅनर्जी यांना पायउतार होण्याशिवाय पर्याय नाही, असे घटनातज्ज्ञ पी. डी. टी. आचार्य यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. हा ऐतिहासिक आणि निर्णायक विजय असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी नमूद केले. गेल्याच महिन्यात ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून पंतप्रधानांचे कौतुक केले होते.