पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या आणि अंतिम टप्प्यात बुधवारी काही ठिकाणी किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता ९१.६६ टक्के मतदानाची नोंंद झाली. यापूर्वी २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात विक्रमी ९३.१९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे दोन्ही टप्प्यांचे मिळून ९२.४७ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्येच मुख्य लढत असून, सोमवारी जाहीर होणार्या निकालाची उत्सुकता आहे.
विधानसभेच्या दुसर्या टप्प्यात दक्षिण बंगालमधील १४२ मतदारसंघांसाठी मतदान झाले. बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. रात्री ७:४५ वाजेपर्यंत ९१.६६ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ झाल्यानंतरही मतदार रांगेत होते. भवानीपूर, दक्षिण २४ परगण्यातील बसंती, नदियामधील चप्रा आणि हावडामधील बाली या सर्व ठिकाणी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर वादांचे प्रसंग उद्भवले. विशेषत: भवानीपूर विधानसभा मतदारसंघात तणावाचे वातावरण होते. याव्यतिरिक्त नदिया, भांगर आणि बाली येथेही हिंसाचार आणि ईव्हीएममधील बिघाडामुळे तणाव होता.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात सुमारे ८७ टक्के मतदान झाले, तर पूर्व वर्धमान जिल्ह्यात सर्वाधिक ९२.४६ टक्के मतदानाची नोंद झाली. ‘स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगालमध्ये नोंदवले गेलेले हे सर्वोच्च मतदान ठरले’, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
आरोप-प्रत्यारोप
– भवानीपूर मतदारसंघात भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरुद्ध निवडणूक रिंगणात आहेत. येथे सायंकाळपर्यंत ८७ टक्के मतदानाची नोंद झाली. ममता बॅनर्जी यांनी सकाळी आठपूर्वीच घराबाहेर पडून विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
– त्यांनी भाजपवर केंद्रीय दलांचा वापर करून निवडणूक फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. ‘भाजपला ही निवडणूक जिंकायची आहे. बंगालमध्ये निवडणुका शांततेत होतात, मग इथे गुंडाराज का?’, असा प्रश्न त्यांनी केला.
– त्यावर ममता यांचे प्रतिस्पर्धी सुवेंदू अधिकारी यांनी हे आरोप फेटाळून लावत त्यांना आपला पराभव दिसत असल्याची टीका केली. त्या सध्या अस्वस्थ असल्याचा टोलाही लगावला.
यंत्रणांची भाजपला मदत : ममता बॅनर्जी
– पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय दले तैनात करण्यात आली आहेत. त्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. राज्यातील निवडणूक ही मुक्तपणे तसेच निष्पक्षपणे झाली नाही, असेही त्या म्हणाल्या.
– ममता यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी केंद्रीय दलांवर आरोप करत, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तसेच उमेदवार प्रतिनिधींना मतदान केंद्रांबाहेर काढल्याचा दावा केला. हे वर्तन अभूतपूर्व होते अशा शब्दांत ममतांनी नाराजी व्यक्त केली.
– केंद्रीय दलांचा उपयोग घटनात्मक सेवेसाठी करण्याऐवजी राजकीय हेतूंसाठी होत आहे, असे ममता म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये निर्भीडपणे मतदान – मोदी
हरदोई : गेल्या सहा ते सात दशकांत यंदा प्रथमच कठोर उपाययोजनांमुळे पश्चिम बंगालमधील मतदारांनी निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावला असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. निकालातून विकसित भारताचा पाया भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घोषणाबाजी, लाठीमार
सुवेंदू अधिकारी यांनी कालीघाट भागात भेट दिली असता, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच एंटली, पाणीहाटी, बसंती आदी भागांतही वादाच्या घटना घडल्या. तृणमूलने केंद्रीय सुरक्षा दलांवर महिला, लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप केला.
