TMC BJP Congress promises for West Bengal Election: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये आज (२३ एप्रिल) मतदान पार पडत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजपा, डावे पक्ष आणि काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी जोर लावला आहे. पश्चिम बंगालची सत्ता मिळविण्यासाठी गेल्या काही निवडणुकांपासून भाजपाने जोरदार प्रयत्न केले आहेत. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने भाजपाने विरोधकांना लक्ष्य केले. त्याशिवाय महाराष्ट्रात ज्याप्रकारे लाडकी बहीण योजना आणून महिलांची मते मिळवण्याचा प्रयत्न झाला. तसाच प्रयत्न पश्चिम बंगालमध्येही सर्व राजकीय पक्षांनी केल्याचे दिसले.

४ मे रोजी पश्चिम बंगालसह केरळ, तमिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि पोटनिवडणुकांचा निकाल लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी महिला, तरुण मतदार आणि सामाजिक कल्याणकारी योजनांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. प्रमुख पक्षांमध्ये योजना जाहीर करण्यात चढाओढ दिसून आली.

रोजगार निर्मिती करणे, कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्वच्छ प्रशासकीय कारभार देण्यासाठी पुढाकार घेऊ असेही आश्वासन प्रत्येक पक्षाने दिले आहे. यानिमित्ताने टीएमसी, भाजपा आणि काँग्रेसच्या आश्वासनांचा घेतलेला हा आढावा.

भाजपाने काय आश्वासन दिले?

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात सांस्कृतिक संदेश आणि उत्तम प्रशासन देण्याचे आश्वासन दिले आहे. वंदे मातरम संग्रहालय, शक्तीपीठ पर्यटन सर्किट यासारखे उपक्रम प्रस्तावित केले आहेत. रवींद्रनाथ टागोर, चैतन्य महाप्रभू आणि पंचानन बर्मा या महापुरुषांचा दाखला देत भाजपाने बंगाली जनतेला आवाहन केले.

सांस्कृतिक मुद्द्यांबरोबरच भाजपाने पश्चिम बंगालमध्ये समान नागरी संहिता लागू करू असे आश्वासन दिले. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यास भाजपा पुढील सहा महिन्यात समान नागरी कायदा लागू करेल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. तसेच या माध्यमातून अवैध स्थलांतरण, जनावरांची तस्करी आणि धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी सुरक्षा दिली जाईल, असेही भाजपाने आश्वस्त केले.

महिलांसाठी दरमहा ३,०००

भाजपाच्या जाहिरनाम्यात महिलांना दरमहा ३,००० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव घेण्यात आला आहे. एक कोटी लोकांना उपजीविकेचे साधन देण्याचे आणि बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेपर्यंत ३,००० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन जाहिरनाम्यात दिले आहे.

इतर आश्वासनांबद्दल बोलायचे झाल्यास केंद्राइतकाच महागाई भत्ता देणे, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, ‘कट मनी’ पद्धत कायमची बंद करणे, आणि एम्स, आयआयटी, आयआयएम आणि फॅशन डिझाइन यासारख्या उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था बंगालमध्ये स्थापन करण्याची ग्वाही भाजपाने दिली आहे.

west bengal election poll
पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी कोणकोणती आश्वासने दिली होती.

टीएमसी महिलांना किती रुपये देणार?

सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षानेही कल्याणकारी योजनांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लक्ष्मीर भांडार सहाय्यतेमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’सारखीच ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दरमहा १,५०० रुपये तर अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिला लाभार्थ्यांसाठी १,७०० रुपये देण्याचे वचन देण्यात आले आहे. तर बांगलार युवा साथी योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी दरमहा १,५०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

टीएमसीच्या जाहिरनाम्यात सर्वांना पक्की घरे, नळाद्वारे पिण्याचे पाणी आणि सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. तसेच अर्थव्यवस्था बळकट करण्याचेही ध्येय समोर ठेवले आहे. पुढील दशकात पश्चिम बंगाल राज्याला देशातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून पाच वर्षात पश्चिम बंगालची अर्थव्यवस्था ४० लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच भाजपाप्रमाणेच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचेही आश्वासन दिले आहे.

काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे आश्वासन काय?

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र ममता बॅनर्जींचा उदय आणि भाजपाच्या विस्तारवादी भूमिकेमुळे डावे पक्ष कमकुवत होत गेले. सध्या काँग्रेस आणि डावे पक्ष पश्चिम बंगालमध्ये आपला आकडा वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही पक्षांनी रोजगारक्षम जाहिरनामा दिला आहे.

प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला कायमस्वरुपी नोकरी, शहरात रोजगार हमी, उद्योगधंद्यांचा विस्तार आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्र उभे करण्याचे आश्वासन डाव्यांनी दिले आहे.

काँग्रेसने प्रशासकीय सुधारणा आणि इतर कल्याणकारी योजना आणण्याचे आश्वासन दिले आहे. यात महिलांना दरमहा आर्थिक मदत, आरोग्य विमा, सरकारी विभागातील पदभरती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होत असून ४ मे रोजी निकाल लागणार आहे.