वृत्तसंस्था, नवी दिल्ली
‘ॲक्सिस माय इंडिया’ या देशातील आघाडीच्या संस्थेने पश्चिम बंगालमध्ये मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान बुधवारी पार पडल्यानंतर अनेक मतदानोत्तर चाचण्या जाहीर झाल्या. पाच संस्थांच्या चाचण्यांमध्ये भाजपला तर दोन संस्थांच्या चाचण्यांमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, ॲक्सिसचा अंदाज न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘ॲक्सिस माय इंडिया’चे संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी काही खासगी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या पाहणीला मतदार प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे पुरेसा प्रातिनिधिक नमुने संकलित झाले नाहीत. त्यामुळे अंदाज जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीशी बोलताना गुप्ता यांनी सांगितले की, “लोकांशी समोरासमोर बोलणे ही ‘ॲक्सिस माय इंडिया’ची पद्धत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यानंतर लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ६० ते ७० टक्के लोकांनी आपले तोंड बंद ठेवले. ते हो किंवा नाही म्हणायलाही तयार नव्हते. निवडणुकीच्या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. केवळ २० ते ३० टक्के लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोणताही अंदाज व्यक्त करणे योग्य नाही, असे आम्हाला वाटते.”
